सध्या कोरोनाच्या संकटाने संपूर्ण विश्वाला हैराण करून सोडले आहे. अशातच खरी व अचूक बातमी जनते पर्यंत पोहोचविण्याचे आव्हान प्रसार माध्यमांवर आले आहे. या बातम्या देताना जबाबदारीचे भान राहून जनतेचा संयम ढळणार नाही अशा प्रकारच्या बातम्या देताना प्रसार माध्यमाचा खरा कस लागतो आहे. यातच एबीपी माझा या वृत्तवहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना अफवा पसरविल्या प्रकरणी पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागल्याने सर्वच प्रसार माध्यमांना आपल्या आपल्या कर्तव्याची योग्य ती जाणीव झाली आहे असे म्हणायला काही हरकत नाही. पण गेल्या दोन वर्षात यु ट्युबवर चॅनल चालू करून त्या द्वारे खऱ्या-खोट्या बातम्या प्रसारित करून ग्राहकांकडून पैसे लुटणाऱ्या यु ट्यूब चॅनलवाल्यांचे भलतेच पेव माजले आहे. वास्तविक पाहता न्युज पेपर अथवा वृत्तपत्र अथवा न्युज चॅनल यांना भारत सरकार कडे स्वतंत्रपणे नियमास अधिन राहून रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. पण काही दिवसात असे रजिस्ट्रेशन केलेले वृत्तपत्र अथवा न्युज चॅनल यांच्या प्रमाणेच हुबेहुब नक्कल करून काही अनधिकृत न्युज चॅनल यु ट्यूब या सोशल मिडियावर कोणत्याही सरकारी रजिस्ट्रेशन शिवाय चालू केलेले निदर्शनास येत आहे. तसेच या यु ट्यूब चॅनलवाल्यांनी स्वतःच अनधिकृत “आय डी कार्ड” बनवून स्वतःला प्रेस “PRESS” घोषित केलेलं आहे, त्यास आवश्यक सरकारी मान्यतेचे कोणतेच रजिस्ट्रेशन अथवा पूर्तता केलेली दिसुन येत नाही.या “फेक” आय डी च्या जोरावर असे स्वयंघोषित पत्रकार जनतेला ब्लॅकमेल करताना व आय डी कार्डचा गैर वापर करताना सर्रास दिसत आहेत.
तरी राज्यशासन व केंद्रशासन
यांनी अशा यु ट्यूब चॅनलला जे स्वतःस न्युज चॅनल म्हणून कोणत्याही रजिस्ट्रेशन शिवाय घोषित करीत आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करून ते यु ट्यूब या साईटवरुन हटवण्याची कठोर मोहीम हाती घेण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.येत्या काळात सरकारी रजिस्ट्रेशन असलेल्या प्रसार माध्यमांनी या विरोधात रान उठविल्यास आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.