सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०४.२०२०
महाबळेश्वर- इको सेन्सेटीव्ह झोन असलेल्या महाबळेश्वर येथे अनधिकृत वृक्षतोड करण्यास व अनधिकृत लाकडांचा साठा करण्यास बंदी आहे. परंतु नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने आपल्या अधिकारांचा गैरवापर करत नगरपालिकेच्या ट्रॅक्टरचा वापर करून चक्क आपल्या घराबाहेर बंदी असलेल्या ओल्या लाकडांचा साठा करून ठेवला.या विरोधात बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक किरण शिंदे यांनी मुख्याधिकारी यांना लेखी तक्रार देऊन कळविले व संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
अधिक माहिती अशी की या अधिकाऱ्याने नगरपालिकेच्या मालकीच्या ट्रॅक्टरचा वापर करून वैयक्तिक वापरासाठी तीन ट्रॉली भरून ओली लाकडे आपल्या घरी नेऊन साठवून ठेवली होती.वास्तवात नगरपालिकेने अशी लाकडे फॉरेस्ट वखार व स्मशानभूमी येथे साठवणूक करण्याची व्यवस्था केली आहे.हा प्रकार समजताच याची तक्रार तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांची भेट घेऊन किरण शिंदे यांनी केली होती परंतु सदर अधिकारी हा मुख्याधिकारी यांचे खास मर्जीतील असल्याने त्याकडे नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले.परंतु किरण शिंदे यांनी वेळोवेळी पालिकेस लेखी अर्ज देऊन कळविल्या नंतर नूतन मुख्याधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घातले असून तो लाकडांचा साठा नगरपालिकेने त्याच्या योग्य ठिकाणी म्हणजे महाबळेश्वर स्मशानभूमी येथे हलविला आहे.
अशी लाकडे ही स्मशानभूमी येथे मृत नागरिकांवर अंत्य संस्कार करण्यासाठी नेली जातात पण अंत्यसंस्कार करण्याची लाकडे देखील असे अधिकारी सोडत नसल्याने हसावे की रडावे अशी प्रतिक्रिया जनतेतून येत असून संबंधित अधिकारी बोट क्लब येथे असताना भ्रष्टाचाराच्या आरोपात देखील सापडला असल्याची माहिती समोर येत आहे.तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर पालिका कारवाई करणार का असा प्रश्न जनतेतून निर्माण होत आहे.