सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.१०.२०२१
महाबळेश्वर- तालुक्यातील पार ग्रुप ग्रामपंचायत जाणीवपूर्वक आमच्या वस्तीकडे दुर्लक्ष करीत असून आजवर आम्हाला कोणत्याही सोयी सुविधा न पुरविल्यामुळे आम्हास रोजच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत स्थानिक नागरिक ‘आडाचा माळ’, ग्रुप ग्राम पंचायत पार येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.या गावात आम्ही अल्पसंख्य असून वस्तीतील सर्वजण हे धनगर या जातीचे आहेत. ग्रामपंचायत पार ही केवळ आमच्या धनगर समाज व बौद्ध वस्ती या दोन वस्त्यांमध्ये कोणतेही विकासकाम जाणीवपूर्वक करत नाहीत. आमच्या विकासकामांबाबत विचारणा केल्यास केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. विकास कामांच्या नावावर खोटी बिले सादर करून भ्रष्टाचार केला जातो अशा प्रतिक्रिया धनगर वस्ती, पार ता. महाबळेश्वर येथील रहिवाश्यांनी निर्भीड पत्रकारशी संवाद साधताना व्यक्त केल्या आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गेल्या आठवड्यात अनुसूचित जातीतील व्यक्तींनि आपल्या वस्तीतील विकासकामांबद्दल ग्रामसभेत प्रश्न विचारला त्याचा राग येऊन नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर न देता ग्रामसेवक मिटिंग सोडून निघून गेल्याची तक्रार पार येथील अनुसूचित वस्तीतील नागरिकांनी गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक व तहसीलदार महाबळेश्वर यांच्याकडे केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर धनगर वस्तीच्या व्यथा देखील समोर आल्याने परिसरात एकच खळबळ माजली असून संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणी ग्रुप ग्रामपंचायत पार च्या गेल्या १० वर्षांतील सर्व व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत असून. पार ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची सविस्तर चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अन्यथा बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी दिला आहे.