मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०७.२०२१
मुंबई- वरळीच्या अभ्यासगल्लीचा आणि जांबोरी मैदानाचा लवकरच पालिकेतर्फे कायापालट केला जाणार आहे. अभ्यासगल्लीत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गात असतात तशी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे, तर जांबोरी मैदानाच्या कडेने ४.५ मीटरची धावपट्टी (जॉगिंग ट्रॅक) उभारण्यात येणार आहे. वरळीच्या एस. के . अहिरे मार्गावरील ‘अभ्यासगल्ली’ ही मुंबईत प्रसिद्ध आहे. वरळी परिसरातील चाळींत लहान-लहान घरांत राहणारे अनेक विद्यार्थी या शांत गल्लीतील झाडांखाली बसून अभ्यास करतात. या गल्लीत बसून अभ्यास केलेल्यांपैकी अनेक जण आता मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करीत आहेत. अभ्यासगल्ली अशी ओळख असलेल्या या रस्त्याचा कायापालट करण्याचे पालिकेच्या जी दक्षिण विभागाने ठरवले आहे. या रस्त्याची ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पदपथावर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बाके, दिवे, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृहे अशी अगदी शाळा किंवा महाविद्यालयांप्रमाणे सर्व सोय केली जाणार असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. या दोन्ही कामांचा खर्च दोन कोटींपर्यंत आहे.
हा संपूर्ण १२ मीटर रुंदीचा आणि ३०० मीटर लांब रस्ता आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन-तीन मीटरचे पदपथ असून त्यावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाला पूरक असे वातावरण, सुविधा दिल्या जाणार आहेत. रस्त्याचे काम रस्ते विभागामार्फत केले जाणार असून पदपथांचे सुशोभीकरण विभाग कार्यालयामार्फत होणार आहे. पदपथावर विद्यार्थ्यांना वाचनाकरिता खास जागा तयार केली जाणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भिंतीही अभ्यासाशी संबंधित चित्रांनी सजवणार आहेत.