पुणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०२.२०२२
पिपरी- चाकण पोलिसांच्या तावडीतून एका सराईत चोरट्याने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खासगी कारमधून त्याला येरवडा कारागृहात नेण्यात येत असताना कारचालक जेवण घेण्यास हॉटेलात जाताच आरोपीने कारमधून पलायन केले आहे. कानिफनाथ विश्वनाथ धनवटे वय ३२, रा. दिघी असे पलायन केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात चाकणचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत वाघुले यांनी तक्रार दिली आहे. गुरूवारी रात्री ही घटना घडली आहे. तक्रारदार शशिकांत वाघुले हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असून, ते चाकण पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. दरम्यान, आरोपी कानिफनाथ याला हिंजवडी पोलिसांनी वाहनचोरी प्रकरणात अटक केली होती. त्याच्याकडून काही गुन्हे उघडकीस आणत तीन वाहने देखील जप्त केली होती. त्यानंतर त्याचा ताबा चाकण पोलीस पथकाने घेतला होता. महाळुंगे चौकीच्या हद्दीतील एका गुन्ह्याचा तपास सुरू होता. यादरम्यान, त्याला न्यायालयाने जेल वॉरंट दिले होते. हे वॉरंट घेऊन तक्रारदार हे खासगी इको गाडीने कानिफनाथला येरवडा कारागृहात नेण्यात येत होते. यावेळी विश्रांतवाडी चौकात एका हॉटेलसमोर गाडी थांबविली. आरोपी कानिफनाथला जेवण घेण्यासाठी कारचालक खाली उतरला. त्यावेळी कानिफनाथ हा तक्रारदार वाघुले यांच्या हाताला झटका देऊन कारमधून पळून गेला . त्याचा शोध सर्वत्र घेण्यात आला. परंतु, तो सापडला नाही. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.