सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२०.०९.२०२०
महाबळेश्वर- तथागत नगर येथे नागरिकांच्या आरोग्यासाठी अविरत सेवा देऊन कोरोना पासून नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी सामाजिक व धार्मिक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष किरण गोरखनाथ शिंदे यांचे हस्ते कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरपालिका कर्मचारी युनियनचे संजय जेधे, मनोज चव्हाण, आयुब वारूनकर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करण्यात आले तर रवींद्र सपकाळ, पांडुरंग काकडे, लक्ष्मण मोरे, सुमित कांबळे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. किरण शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी नगरपालिका स्वच्छता कर्मचारी हे प्रसंगी धोका पत्करून नागरिकांच्या जीवाची काळजी घेण्यासाठी फिल्डवर प्रत्यक्ष काम करत असतात ते गेली ७ महिने नडगमगता अविरत कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करीत असल्याचे किरण शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर आपण केलेल्या या गौरवाने भारावून गेलो असून आमची शहरवासीयांच्या रक्षणासाठी काम करण्याची इच्छा द्विगुणित झाली असून या पुरस्काराने आम्हा सर्व कामगारांना प्रोत्साहन मिळाले आहे असे विचार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष संजय जेधे यांनी व्यक्त केले आहेत.
★नगरपालिका कर्मचाऱ्यांची पिळवणूक होऊ देणार नाही-किरण गोरखनाथ शिंदे
या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांना काम करत असताना ज्या ज्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्या समस्या समाजसेवक किरण शिंदे यांच्या समोर मांडल्या तर अनेक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडून आमच्यावर अन्याय होत असून आम्हास आमच्या हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवले जात असून आमची पिळवणूक होत आहे व त्यासाठी किरण शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आवाज उठवावा अशी विनंती केली. त्यावर इथून पुढे एकाही नगरपालिका कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. मी देखील एका माजी नगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा असुन कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी अगदी जवळून पाहिल्या असून भविष्यात त्या कर्मचाऱ्यांच्या सोबत राहून प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही किरण गोरखनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे.
सदर कार्यक्रमास सुरक्षेच्या सर्व खबरदारी घेऊन नियमांचे पालन करण्यात आले होते. या पुरस्काराने मनोबल वाढल्याची भावना सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमास किरण शिंदे, संजय जेधे, मनोज चव्हाण, सुमित कांबळे, आयुब वारूनकर, रविकांत सपकाळ, उमेश रोकडे, भिकन मोरे, पांडुरंग काकडे, लक्ष्मण मोरे, विशाल लालबेग, अक्षय काकडे, अजिंक्य कांबळे, केतन जाधव यांचेसह स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.