पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.०९.२०२१
पुणे- मोठा गाजावाजा करत शहरात उभारण्यात आलेली बहुतांश ई-टॉयलेट्स बंद असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. देखभाल दुरुस्तीची निविदा काढल्यानंतरही ई-टॉयलेट्स बंद असून त्यांची दुरवस्थाही झाली आहे. महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची संख्या शहरात आधीच कमी असताना या योजनेत महिलांसाठी बारा ई-टॉयलेट सुरू करण्यात आली होती. मात्र त्यांचीही पूर्णत: दुरवस्था झाली आहे. दरम्यान, ई- टॉयलेट्सच्या देखभाल दुरुस्तीचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले असून टॉयलेट सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता लक्षात घेत गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार विकास निधीतून शहरात अत्याधुनिक आणि स्वयंचलित ई-टॉयलेट्सची उभारणी करण्यात आली आहे. शहरात सध्या चौदा ठिकाणी स्वयंचलित ई-टॉयलेट्स आहेत. या अत्याधुनिक ई-टॉयलेट्सचे व्यवस्थापन आणि देखभाल दुरुस्तीचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. करोना संसर्ग कालावधीत या कंपनीबरोबरच करार संपला आणि त्यानंतर ई-टॉयलेट बंद पडली. ई-टॉयलेटचा वापर करण्यासाठी शुल्क आकारले जात असले, तरी टापटीप, सुरक्षितता, अत्याधुनिक सुविधा आदी कारणांमुळे टॉयलेटचा वापरही वाढला होता.विशेषत: महिलांकडूनही त्याचा मोठा वापर होत होता. नव्या कराराअभावी ई-टॉयलेटच्या देखभाल दुरुस्तीचे काम त्याच संस्थेला पुन्हा देण्यात आले. मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणची ई-टॉयलेट बंद असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. अनेक ई-टॉयलेटमधील कॉइन बॉक्सची मोडतोड करण्यात आली असून काही ठिकाणी पायाभूत सुविधांचीही कमतरता आहे. त्यामुळे ई-टॉयलेटही वापराविना पडून राहिली आहेत.