खराडी, चंदननगर भागातील दहशतीचे वातावरण बदलायचे असेल तर सुनील टिंगरेंना निवडून द्या- बाळा पऱ्हाड
पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१६.११.२०२४
पुणे- खराडी, चंदननगर, वडगाव शेरी भागात अहमदनगर जिल्हा व शिरूर तालुक्यातून शिक्षण, नोकरी व्यवसायानिमित्ताने हजारो नागरिक स्थायिक झाले आहेत. मात्र, बाहेरून आलेल्या आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्थानिक पुढाऱ्यांच्या दडपशाही आणि दहशतीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील दहशतीचे वातावरण बदलून स्वातंत्र्यात जगायचे असेल तर वडगाव शेरी, चंदननगर व खराडीतील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरेंना निवडून द्यावे, असे आवाहन आम्ही शिरूरकर मित्र परिवार फाउंडेशनचे अध्यक्ष बाळा पऱ्हाड यांनी केले आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सुनिल टिंगरे यांना आम्ही शिरूरकर मित्र परिवार फाउंडेशनने जाहीर पाठींबा दिला आहे. याबाबत आपली भुमिका मांडताना अध्यक्ष पऱ्हाड यांनी म्हटले आहे. आम्ही अनेक वर्ष स्थानिक नेतृत्वासोबत काम करूनही कधी साधे कौतुकही झाले नाही. मात्र २०१४ व २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात काम करूनही त्यांनी मनात अकास न ठेवता सामाजिक उपक्रमांमध्ये मदत केली. मी दुचाकीवरही कधी कुणाला सोबत ठेवत नाही. कारण त्यामुळे स्थानिकांकडून त्या कार्यकर्त्याला किंवा त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ शकतो, याची जाणीव मला आहे. त्यामुळे असे दहशतीचे वातावरण पुढील काळात बदलायचे असेल, सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ द्यायचा नसेल आणि स्वाभिमानाने आणि स्वातंत्र्याने जगायचे असेल तर वडगावशेरी, खराडी परिसरातील नागरिकांनी आमदार टिंगरे यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन पऱ्हाड यांनी केले आहे. त्याचबरोबर प्रेमाने, आशीर्वादाने मने जिंकता येतात. दडपशाही, दहशतीने ते होत नाही, असा टोलाही पऱ्हाड यांनी लगावला.
पाठिंबा देताना त्यावेळी भाजपचे पदाधिकारी सचिन सातपुते, शैलजित बनसोडे, अनिल नवले उपस्थितीत होते.
▪️पोस्टच्या लाईकवरही दुसऱ्याचे नियंत्रण
आपण कुणाची पोस्ट लाईक करायची, कुणाच्या पोस्टवर कमेंट करायची, आपल्या वैयक्तिक कार्यक्रमांना कुणाला बोलवायचे, कार्यक्रम पत्रिकेत कुणाची नावे कुठे टाकायची, यावर कुणी दुसरेच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत असेल तर आपण खरंच स्वातंत्र्यात आहोत का, असा सवालही पऱ्हाड यांनी येथील मतदारांना उद्देशून उपस्थित केला आहे.
———————————