सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०९.२०२१
महाबळेश्वर- महाबळेश्वर येथे गेले वर्षभरापासून महिला व बालकांच्या बाबतीतील अत्याचारामध्ये लक्षणीय वाढ झाली असून या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. वर्षभरापूर्वी सेठ गंगाधर माखरिया हायस्कूल या शाळेच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती.त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी महाबळेश्वर येथे राजेंद्र महादेव जाधव नामक नराधमाने आपल्या पत्नीस पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली असून पीडितेचा या घटनेत मृत्यू झाला झाला आहे तर आरोपी फरारी आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याशी शरीर संबंध ठेवून तिला गरोदर ठेऊन तिचे अपत्य बेकायदेशीर रित्या दत्तक देण्याची किळसवाणी, चीड आणणारी घटना समोर आली असून या गुन्ह्यांत एका राजकीय पुढाऱ्याचा हस्तक्षेप असल्याची बाब देखील उघड झाली आहे. परंतु राजकीय दबावापोटी त्याचेवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असून सदर बाब चिंतेची आहे त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही दबावास बळी न पडता संबंधित पुढाऱ्यावर तात्काळ गुन्हा नोंद करून अटक करण्यात यावी अशी मागणी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या निवेदनात केली आहे. तर सदर कृत्य हे निंदनीय असून या गुन्ह्यातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आर पी आय(आठवले) च्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदन हे मुख्यमंत्र्यांचे नावाने असून द्वारे पोलीस निरीक्षक यांचे मार्फत देण्यात आले आहे. वरील आशयाचे निवेदन पोलीस निरीक्षक भागवत यांचेकडे देण्यात आले.हे निवेदन देताना बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे किरण शिंदे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष जॉन जोसेफ,पप्पू भोसले, फारूकभाई वारूणकर, सलमान(मुन्ना) मुलानी,आझाद(बबलू) मुलानी,विनय गायकवाड, अमोल काकडे यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.