गडचिरोली(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.०८.२०२२
आरमोरी- जोगीसाखरा येथे संपन्न झालेल्या आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे तसेच अध्यक्ष म्हणुन सरपंच संदिप ठाकुर तर विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती च्या सदस्य वृंदाताई गजभिये, ग्रा.प.सदस्य अश्विनी घोडाम जंकास संस्थेचे संचालक यादोराव कहालकर, शामराव पेन्दाम, बाबुराव टेंभुर्णे, देवराव पेन्दाम, भाष्कर राऊत आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. उद्घाटनिय भाषणात पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे मार्गदर्शन करतांना म्हणाले की. मानवीय विकासाची परिभाषा न समजता भौतिक विकासाच्या चुकीच्या समजुतीमुळे आणि खा- प्या मौज करा ही लौकिक धारणा केल्यामुळे हा मानव जीवनाच्या उपभोगी लालसेमुळे अंधार कोठडीत चाचपडत आहे.

मानवीय विकास हेच प्रथम, मध्य आणि अंततः सुखकर आहे, हे आकलन मानवाला होणे आवश्यक आहे. असे होण्यासाठी मानवाला आज मोठी जोखीम स्वीकारावी लागणार आहे. त्याला मोठ्या हानीला तोंड द्यावे लागेल, परंतु असे न घडण्यासाठी हा मानव साहित्याचे निर्माण करीत आहे, अजाणत्यांचे प्रबोधन करीत आहे, त्यानुसार शिक्षण पध्दतीचे निर्माण करीत आहे. परंतु तरीही जो प्रवास त्याने सुरू केलेला आहे, तो हानिकारक, विध्वंसक गुंतव्यापर्यंत जाणारा आहे. याची ओळख त्याला न पटल्यामुळे तो आपला प्रवास थांबवण्यास किंवा त्या प्रवासाची दिशा बदलण्यास कदापि तयार नाही. अशा विरोधाभासी अवस्थेत हे मानवी जीवन दीशाहीन ठरून विध्वंसकारी ठरले आहे. मानवाचा मानवी विकास मानवच करू शकतो, यांत्रिक निर्जीव वस्तू कशा करू शकतील ? भौतिक वस्तू मानवाचा विकास कशा करू शकतील ? मनुष्य भौतिक संपन्नतेचा उपभोग घेऊन सर्व काळ सुखी होऊ शकणार नाही. याच भौतिकतेचे संशोधन आणि मानवीयतेची हेळसांड मानवाला विध्वंसेकडे सोयीस्करपणे घेऊन जात आहे. नैसर्गिक संकट, आपत्ती ही थोपविणे शेवटी मानवाच्या कक्षेत नाही, परंतु मानवनिर्मित आपत्ती थोपविणे हे मानवाच्या कक्षेत आहे. भौतिक विकासच जीवनाची आवश्यकता ठरविणारी लोकजीवन पध्दती चुकीची असून, मानवीय विकासासाठी नियामक, योग्य लोकजीवन पध्दती ठरविणे आवश्यक आहे. अनिर्बंध भौतिक विकास हा संपूर्ण जीवित विनाशाला कारणीभूत ठरणार आहे, यामध्ये दुमत नाही. परंतु या अधोगती आणि विनाशाला थांबविणे आवश्यक आहे. बाह्य वस्तूंचे संशोधन, बाह्य वस्तूंचा विकास हा मानवाचा मानवीय विकास होऊ शकत नाही. आंतरिक तत्वांचे संशोधन, आंतरिक तत्वांचा विकास हेच मानवाच्या विकासाचे सत्य आहे असे मौल्यवान माहिती याप्रसंगी पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गुरुदेव जंकासंस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी केले तर आभार सुनिल कुमरे यांनी मानले या प्रसंगी संपूर्ण गावातील आदिवासी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.