नवी मुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, मिंलीद राऊत
दि.२८.०१.२०२३
नवी मुंबई- नवी मुंबईतील महापे येथील सरकारी जागेवर राहणाऱ्या बेघर, निराधार, भटक्या, लोकांच्या झोपड्या २३ जानेवारी रोजी पोलीस बळाच्या जोरावर जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केल्या. ही बातमी बहुजन समाज पार्टी नवी मुंबई युनिटचे अध्यक्ष राजेश जैस्वार यांना समजली.
२६ जानेवारी २०२३ रोजी बहुजन समाज पार्टी चे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य अप्पाराव थोटे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई प्रभारी प्राध्यापक दत्ता हेगडे, अध्यक्ष राजेश जैस्वार, इतर पदाधिकारी, तसेच असंख्य कार्यकर्ते व पत्रकार यांच्यासह त्या बेघर झालेल्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट दिली. तेथे झालेल्या सभेस तेथे जमलेल्या सर्व झोपडपट्टीवासीयांना आप्पाराव थोटे संबोधित करताना म्हणाले की, “तुमच्यावर झालेल्या अन्यायाला बहुजन समाज पार्टी वाचा फोडेल. घाबरू नका. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत.” असे सांगून त्यांना धीर दिला. नवी मुंबई बसपा अध्यक्ष राजेश जैस्वार व प्रभारी दत्ता हेगडे यांनी आपल्या आक्रमक शब्दात गरिबांच्या झोपड्या तोडणाऱ्यांचा निषेध केला.
नवी मुंबई बसपा प्रभारी प्राध्यापक दत्ता हेगडे सर म्हणाले की,”या नवी मुंबईमध्ये तुम्हाला हक्काचे घर मिळण्यासाठी मोठा लढा उभारू. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, या मूलभूत गरजा देण्याची जबाबदारी सरकारची असताना ती पूर्ण न करता गरिबीतून उभ्या केलेल्या झोपड्या पाडण्याचे पाप ज्यांनी केले त्यांना योग्य धडा शिकवू. एका बाजूला नवी मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता अभियानात पहिला नंबर येण्यासाठीची धडपड आणि दुसऱ्या बाजूला गरीबांच्या झोपड्या उध्वस्त करून शेकडो गरीब, मजूर, पारधी, भटके, विविध राज्यातून आलेले निराधार कामगार यांचे संसार उध्वस्त करण्यातही पहिला नंबर आणण्याची तयारी चालू आहे का? असाही प्रश्न प्रा.हेगडे यांनी विचारला. गरिबांना हटवून झोपड्या पाडून, पूला खालचे, आणि रेल्वे स्टेशन वरील निराधार हटवून, जर पहिला नंबर आणणार असाल, तर बहुजन समाज पार्टी ते खपवून घेणार नाही. सरकारला आम्ही एवढेच सांगू इच्छितो की, आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत. त्यामुळे ‘जो जमीन सरकारी है, वो जमीन हमारे है।’ हा न्याय तुम्हाला मान्य करावा लागेल.
यावेळी अन्यायग्रस्त लोक, अनेक पारधी कुटुंबे, घाबरलेल्या स्त्रिया, वृद्ध, लहान मुले, गांगरलेली होती. त्यांचा संसार उघड्यावरती विस्कटलेल्या अवस्थेत होता. तसेच उत्तर भारतासह अनेक प्रांतातून आलेले मजूर कुटुंब यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.