वाशीम(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०८.२०२२
वाशिम- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १३ते १५ ऑगस्ट दरम्यान केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या ज्ञात,अज्ञात क्रांतीकारक व स्वातंत्र्य सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांनाच ७५ वर्षाचा गौरवशाली इतिहास मांडत प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात १३ते १५ ऑगस्ट दरम्यान २ लाख २२ हजार ५१७ ठिकाणी भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा अभिमानाने फडकणार आहे. जिल्हा परिषदेने २ लक्ष २२ हजार ५१७ ठिकाणी तिरंगा लावण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये २ लक्ष १८ हजार ४०३ घरांचा समावेश आहे. कारंजा तालुका -३४ हजार ५३८, मालेगांव तालुका- ४१ हजार २८९, मंगरुळपीर तालुका- ३२ हजार ३३२, मानोरा तालुका- ३५ हजार ५०२, रिसोड तालुका- ३६ हजार ५३४, ठिकाणी आणि वाशिम तालुका- ३८ हजार २०८ घरांचा समावेश आहे.
वाशिम जिल्ह्यातील ७७५ शाळांवर राष्ट्रध्वज फडकणार असून कारंजा-१४७, मालेगांव- १३२, मंगरुळपीर- ११९, मानोरा- १३२, रिसोड- १०८ आणि वाशिम तालुक्यातील १३७ शाळांचा समावेश आहे. ग्रामीण भागात असलेल्या १०९३ अंगणवाड्या, २७ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५९ आरोग्य उपकेंद्र आणि २०५७ शासकीय इमारतीवर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे.
‘घरोघरी तिरंगा’ या अभियानातंर्गत प्रत्येकाला नि:शुल्क राष्ट्रध्वज उपलब्ध होणार नाही. नागरीकांनी स्वत: विकत घेवून तो आपल्या घरावर उभारायचा आहे. गावपातळीवर देखील स्वस्त धान्य दुकान किंवा महिला बचतगटांच्या माध्यमातून राष्ट्रध्वज विक्री केंद्रातून ध्वज उपलब्ध होणार आहे. राष्ट्राभिमान जागृत करणाऱ्या या उपक्रमात राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जावा. त्याचा अवमान होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात यावी. ध्वजसंहितेचे पालन प्रत्येक व्यक्तीने करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.