पिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, आनंद मोरे
दि. २०.०३.२०२४
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातील दिव्यांग कक्षाच्या वतीने दिव्यांग भवन फाऊंडेशन या कंपनीसाठी मुलाखातीद्वारे (वॉक इन इंटरव्हू) पद्धतीने भरण्यात येणा-या विविध ३१ पदांच्या मुलाखती स्थगित करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग दिव्यांग कक्षाच्या वतीने दिव्यांग भवन फाऊंडेशन या कंपनीसाठी ३१ पदे मुलाखतीद्वारे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार दि.२६,२७ व २८ मार्च २०२४ रोजी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडील पत्रानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून त्यात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. या निर्देशांच्या अनुषंगाने दिव्यांग भवन फाऊंडेशनसाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती नुसार होणा-या विविध पदांसाठीच्या मुलाखती स्थगित करण्यात आले असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
महापालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध ३१ पदांच्या मुलाखतींसाठी पुढील तारीख व वेळ महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर व वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.