पिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, आनंद मोरे
दि. २०.०३.२०२४
पिंपरी– महापालिकेच्या वतीने दर गुरूवारी सायकलवरून कामावर अर्थात ‘’सायकल टू वर्क थर्सडे’’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत दिवसेंदिवस सहभाग वाढत चालला आहे, ही बाब अतिशय समाधानकारक असून यामध्ये नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्वाचा आहे. शहरातील नागरिकांनी या मोहिमेत जास्तीतजास्त संख्येने सहभागी होऊन स्वतःचा जीवनप्रवास आरोग्यदायी करावा, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची रस्त्यांवरील वाढती संख्या आणि प्रदूषणात तसेच तापमानात होणारी वाढ लक्षात घेता यासंदर्भात महापालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने दर गुरूवारी सायकलवरून कामावर अर्थात ‘’सायकल टू वर्क थर्सडे’’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला व्यापक रुप देण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे, असेही आयुक्त सिंह म्हणाले.
‘’सायकल टू वर्क थर्सडे’’ या उपक्रमाच्या अनुषंगाने आज महापालिकेचे काही अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या निवासस्थानापासून ते महापालिका कार्यालयापर्यंत सायकलवर प्रवास करत पोहोचले. त्यामध्ये सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, उप आयुक्त यशवंत डांगे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, सुनील भागवानी,कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर आदी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.