हडपसरमध्ये यंदा ‘तुतारी’च वाजणार- प्रशांत जगताप
पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.११.२०२४
▪️घरोघरी जाऊन नागरिकांशी साधला संवाद; पदयात्रा, बाईक रॅलीतून प्रभावी प्रचार
पुणे- हलगी, ढोलताशांचा गजर, ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’चा जयघोष, ‘प्रशांतदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’चा नारा, जोडलेले हात अन मतदारांचा आशीर्वाद, पदयात्रेत येणाऱ्या मंदिरांचे दर्शन अन स्मारकांना अभिवादन अशा वातावरणात हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांनी शनिवारी पदयात्रा व बाईक रॅली काढून प्रचार केला. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. जाहीरनामा पत्रक वाटून जनतेला हडपसरच्या प्रगत भविष्यासाठी विकासाचे मॉडेल त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. प्रचाराला अवघे दोन दिवस बाकी असल्याने मतदारसंघातील प्रत्येकापर्यंत पोहोचण्याची लगबग पाहायला मिळत आहे. प्रशांत जगताप यांनीही शनिवारचा विकेंडचा योग साधत मतदारसंघाच्या विविध भागात फिरून मतदारांशी संवाद साधला. घरोघरी त्यांचे औक्षण करण्यात आले. फटाके वाजवून पुष्पगुच्छ देऊन ठिकठिकाणी स्वागत झाले. कोंढवा गाव, सिद्धार्थनगर, भाग्योदयनगर, सय्यदनगर व अन्य भागात फिरत यंदा परिवर्तन घडवण्याचा निर्धार केला.
प्रशांत जगताप म्हणाले, “मतदारसंघातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचता आले, याचे समाधान आहे. त्याहून अधिक आनंदाची गोष्ट म्हणजे येथील प्रत्येक नागरिक माझ्या पाठीशी उभा असल्याचा विश्वास देत आहे. अकार्यक्षम, लोकांच्या मदतीला न येणाऱ्या आमदाराला घरी बसवण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. हडपसरच्या विकासासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा अनुभव, दूरदृष्टी यातून मार्गदर्शन घेऊन शहराचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, याचे नियोजन मी केले आहे. आमदार झाल्यावर ही सगळी विकासकामे सर्वांना सोबत घेऊन मार्गी लावणार आहे. पाण्याचा, वाहतूक कोंडीचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार असून, अपघातमुक्त हडपसर शहर बनवणार आहे. मतदारसंघात पोलीस चौकी, पोलीस स्टेशनची संख्या वाढवण्यासह महिलांसाठी स्वतंत्र सहायता कक्ष उभारणार आहे.