हडपसरवासियांचे प्रशांत जगताप यांना झुकते माप!
पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१६.११.२०२४
- विकासाभिमुख, निष्ठावान व स्वाभिमानी चेहऱ्याला निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. मतदानाची वेळ अवघ्या काही दिवसांवर आली आहे. हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांना झुकते माप असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विकासाभिमुख, निष्ठावान व स्वाभिमानी चेहऱ्याला आमदार म्हणून विधानसभेवर पाठवण्याचा निर्धार हडपसरच्या मतदारांनी केल्याचे वातावरण आहे.
निष्ठावान विरुद्ध गद्दार, अकार्यक्षम विरुद्ध विकासाभिमुख असा लढा या मतदारसंघात आहे. पाणीटंचाई, वाहतूककोंडी, वाढलेली गुन्हेगारी, स्वतंत्र महापालिकेची गरज, महिलांची सुरक्षा असे अनेक मुद्दे घेऊन प्रशांत जगताप यांनी प्रचाराचा झंझावात सुरु ठेवलेला आहे. राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार इम्रान प्रतापगढी या स्टार प्रचारकांच्या सभांनी जगताप यांची दावेदारी प्रबळ केली आहे. शिवाय, जगताप यांनी घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यावर, तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्यावर भर दिल्याने मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना लाभत आहे.
विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षांत हडपसरला एकही भरीव काम केले नसल्याचा, तसेच नागरिकांशी संपर्क ठेवला नसल्याचा राग लोकांच्या मनात आहे. ज्यांनी पालिकेत, विधानसभेत असंख्य संधी दिल्या, त्या शरद पवार यांच्याशी गद्दारी करीत विरोधात जाणे मतदारांना पटलेले नाही. त्यामुळे पवार यांनीही चेतन तुपे यांच्यावर टीका करत अशा दिवट्या आमदाराला घरी बसवण्याचे आवाहन कालच्या सभेत केले होते. गद्दार विरुद्ध स्वाभिमानी ही लढाई आपणच जिंकणार असल्याचा विश्वास प्रशांत जगताप व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी जगताप यांनी काळे बोराटेनगर येथील लहान-थोरांचे आकर्षण केंद्र असलेल्या ग्लायडिंग सेंटरला भेट देत तेथील नागरिकांशी संवाद साधला. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला बळ द्यावे. येत्या २० नोव्हेंबर रोजी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केले.