सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१९.०८.२०२२
🔹ठेकेदारास काळ्या यादीत टाकून चौकशी करावी
पाटण- पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या हेळवाक ते घाटमाथा आणि संगमनगर धक्का ते पाटण या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. अवघ्या दोन ते तीन महिन्यात रस्त्याची झालेली दुरवस्था यावरून हे काम किती निकृष्ठ दर्जाचे झाले आहे हे लक्षात येते. त्यामुळे संबंधित ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकून त्याची चौकशी करावी. अन्यथा सोमवार दि. २१ रोजी कराड-चिपळूण रस्त्यावरील संगमनगर येथे कोयना विभागाच्यावतीने आंदोलन छेडू, असा इशारा पंचायत समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते बबनराव कांबळे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, हेळवाक ते घाटमाथा आणि संगमनगर धक्का ते पाटण या रस्ता डांबरीकरणााचे काम संबंधित ठेकेदाराने दोन ते तीन महिन्यांपूर्वी केले आहे. आताच्या घडीला या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. वाहन धारकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागतआहेत. खड्डे चुकवण्याच्या नादात दोन दिवसांपूर्वी एक ट्रकही पलटी झाला आहे. खड्ड्यांमुळे पुन्हा अपघातांची मालिका सुरू झाली आहे. शिवाय खड्ड्यांमुळे वाहनाचे नुकसान होत असून सर्वसामान्य नागरीक व वाहन चालकांनासह पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर ठेकेदाराने रस्त्याचे केलेले काम पूर्णपणे चुकीचे केले असून अत्यंत निकृष्ठ दर्जाचे डांबरीकरणाचे काम झाले आहे. वेळोवेळी आंदोलने करूनही ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. जोपर्यंत या रस्त्याचे काम दर्जेदार होत नाही तोपर्यंत ठेकेदाराची कामाची बिले काढू नयेत. तसेच ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकून त्याची खातेनिहाय चौकशी करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही विविध संघटना, मंडळे व कोयना विभागाच्यावतीने संमनगर (धक्का) येथे रास्तारोको आंदोलन करू, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार पाटण, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोयनानगर यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर पंचायत समितीचे सदस्य बबनराव कांबळे, ज्ञानदेव कदम, संजय कांबळे, पंकज गुरव, मंगलताई माने, श्रीपतराव माने, सुरेश लोखंडे, प्रकाश कांबळे, चंद्रकांत कांबळे, गोविंद बल्लाळ, प्रदीप कांबळे, महेंद्र कदम, सरपंच राजेश पवार यांच्या सह्या आहेत.