पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२०.१०.२०२४
पिंपरी – पुणे महानगरपालिकेच्या विद्यानिकेतन क्र. ५ बोपोडी येथील विद्यालयातील तब्बल २५ वर्षांनी शिक्षक दिन विशेष अश्या सप्टेंबर महिन्याचे औचित्य साधून, १९९९ सालच्या सातवीला असलेले माजी विद्यार्थी आणि त्यांचे गुरुजन वर्ग, सेवकवर्ग यांचा “रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा ” साधना तांबेपाटील आणि अमित दीक्षित” यांच्या संकल्पनेतून आणि सर्व वर्ग मित्रांच्या सहकार्याने एक महिन्याच्या आत सर्वांशी संपर्क करून कामिनी बँक्वेट, पिंपळे सौदागर येथे भव्य आणि दिमाखदारपणे कार्यक्रम संपन्न झाला, हे सर्व पाहून गुरुजनांस सुखद अनुभव मिळाला.
सर्व गुरुजन तसेच माजी विद्यार्थ्यांना फेटे बांधले. शिक्षकांचे फुलांच्या पायघड्या आणि फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले सर्व विद्यार्थिनींनी शिक्षकांचे औक्षण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान असलेले सर्व गुरुजन यांनी विद्यार्ध्याना मार्गदर्शन, आशिर्वाद आणि आयुष्यभर पुरेल अशी पुरून उरणारी संस्काराची शिदोरी दिलेली आहे.
सर्व शिक्षकांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती देवी पूजन करण्यात आले. शिक्षक आणि विद्यार्थिनींने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. तद्नंतर, ओंकार स्वरूपा या गीताने सुरेल सुरवात झाली. स्नेहमेळाव्यात शिक्षकांनी शालेय जीवनातील आठवणी, गमतीजमती सांगून मनोगत व्यक्त केले. शाळा जरी संपली असली तरी शिक्षकांच्या संस्काराची शिदोरीने विद्यार्थ्यांची ओंजळ पुन्हा एकदा भरत होती. सर्व माजी विद्यार्थ्यांनी यशाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत. कुणी उच्चपदावर कार्यरत आहे तर कुणी यशस्वी व्यावसायिक आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. कि. पा. चौधरी सर, श्री. द. ल. लोखंडे सर, श्री. वायाळ सर, श्री शिंपी सर, श्री. फिरोदिया सर, श्रीमती जयश्री लेंभे मॅडम, श्री नरेंद्र पाटील सर, श्रीमती फसले मावशी हे उपस्थित होते.
आज पुन्हा नव्याने भरली होती “माझी शाळा” मनात होता तोच आदर आणि होता सोबतीस “काळा फळा” बरसुनी गेल्या आजही चेहऱ्यावर त्याच “कुतुहलाच्या सरी” घेण्यात आली जेव्हा शाळेतील तिचं “पटावरील हजेरी” – साधना तांबे.
२५ वर्षांनी सर्वांची भेट झाल्यावर शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आपले मनोगत आणि कवितेतून सतत चार वर्ष अनुभवलेली शाळा, मित्रता शाळेतील गमती जमती, मिळालेले ज्ञान, संस्कार, शालेय परिसर हे सर्व आठवूण जुन्या आठवणींना उजाळा देत असताना सारेजण भावूक झाले होते. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या कर्तव्याच्या कार्यबाहूल्यावर कायमच शिक्षकांनी दिलेले धडे व संस्कार हेच लक्षात ठेवू अन् नाविन्याचा ध्यास ठेवत उत्तरदायित्वाप्रती खूणगाठ बांधली.
पुन्हा एकदा सर्व शिक्षक आणि मा.लेंभे मॅडम यांनी त्यांच्या दमदार शैलीत पुढच्या पिढीची नावे हे कशी अर्थपूर्ण हवीत हा संस्कृतीचा, संस्काराचा ठेवा आपल्याला जपायलाच पाहिजे. आपण देशाचे आणि समाजाचे देणे लागतो आपण सुजाण नागरिक होणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे हे सांगितले.
सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुजनांना कृतज्ञता म्हणून फुल ना फुलाची पाकळी असे भेटवस्तू स्वरूपात चांदीचे गणपती बाप्पा, फुलांची रोपे, मिल्टन बॉटल्स इ. देण्यात आले आणि परितोष कोल्हे या विद्यार्थ्याच्या वतीने डिनर सेट तसेच रुपेश महाडिक आणि समाधान कांबळे यांच्या वतीने भारताचे संविधान हे पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले. कार्यक्रमाच्या खर्चाची उरलेली रक्कम अनाथ आश्रमास दान करण्याचा निर्णय घेऊन मानवतेचे दर्शन घडवून एक नवीन आदर्श माजी विद्यार्थ्यांनी जगासमोर ठेवला आहे.
सर्व गुरुजनांनी भविष्यात सर्व माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात सदैव यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देऊन अध्यक्षीय समारोप केला.
हर्ष उल्हासित असा दिमाखदार सोहळा यशस्वी करण्यासाठी रुपेश महाडिक, राजू कोरे, निलेश शिरसाट, अमित दीक्षित, समाधान कांबळे, साधना तांबेपाटील यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यास परिश्रम घेतले.
आभार प्रदर्शन झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता ही ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करून तद्नंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला.