पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.०५.२०२०
पुणे- पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना लॉकडाऊनमुळे पावसाळ्याच्या वस्तूंची खरेदी देखील लोकांना करता आलेली नाही. त्यातच आता लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जर हा लॉक डाऊन वाढला तर पावसाळ्यात लागणारी छत्री, रेनकोट तसेच प्लास्टिक वस्तू कशा खरेदी करणारा याच्या चिंतेत असलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत पावसाळ्याचा हंगाम सुरू होणार असल्याने छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
राज्यात साधारणत: ७ जूनच्या दरम्यान पावसाळ्याला सुरूवात होते. त्यामुळे जर १८ मे पासून सुरू होणारा लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढविला गेल्यास ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळेच येणारा पावसाळा लक्षात घेवून छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे. लॉकडाऊनच्या काळात करावयाच्या उपायांच्या संदर्भात आज शासनामार्फत सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. हा आदेश ३० सप्टेंबर पर्यंत लागू राहील. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक २ मे २०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे.



















