सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०३.११.२०२०
महाबळेश्वर- शहरातील पाणी पुरवठा करण्यासाठी असलेल्या मोठ्या स्त्रोतांपैकी एक म्हणजे ब्रिटिशकालीन ग्लेन ओगल धरण आहे. या तलाववजा धरणामधून काही पाणी झिरपून ओढ्यामार्गे सुप्रसिद्ध अशा चायनामन वॉटर फॉल ला जाते तेथून पुढे ते डोंगरमाथ्यावरून वाहत बिरवाडी गावापर्यंत जाते व तेथून पुढे कोयना नदीला मिळते.या ग्लेन ओगल धरणाला लागून भारत हॉटेल हे प्रशस्त व्यवसायिक हॉटेल आहे. ग्लेन ओगल जलाशयाच्या बाजूने जे काही पाणी वाहते तेथेच खालच्या बाजूला अगदी ब्रिटिश कालीन धोबीघाट आहे. या धोबीघाटाचा वापर येथील लाँड्री व्यवसाय करणारे बांधव पूर्वापार करत आहेत. नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी येथे धोबीघाट बांधुन देखील घेतला आहे. विशेष म्हणजे या शुद्ध अशा नैसर्गिक पाणी स्त्रोतामध्ये भारत हॉटेलचे मैला मिश्रित, अशुद्ध, प्रदुषित, दुर्गंधीयुक्त सांडपाणी कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता उघडपणे सोडले जात आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून हा प्रकार राजरोसपणे चालू असून नागरिकांनी अनेकदा तक्रारी देऊन देखील नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी या हॉटेल विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. राज्य शासनाचे नियमाप्रमाणे महाबळेश्वर शहराचे हद्दीत हॉटेल व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी आपल्या हॉटेल मध्ये निर्माण होणाऱ्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापर करावयाचे आहे. असे असताना नगरपालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना व पदाधिकारी यांना हाताशी धरून पर्यावरणाचे सर्व नियम असे हॉटेल व्यवसायिक धाब्यावर बसवत आहेत. जिथे नगरपालिकेचे एस टी पी प्लांट पूर्णतः बंद अवस्थेत आहेत तिथे व्यवसायिक पर्यावरणाचे नियम पाळणार का ? महाबळेश्वरच्या नागरिकांच्या सुदैवाने लाभलेल्या नवीन मुख्याधिकारी या प्रकरणाला आळा बसविणार का ? प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा बेजबाबदार हॉटेल वाल्यांच्या बेजबाबदार उद्योगावर कारवाई करणार का ? असे अनेक प्रश्न यानिमत्ताने नागरिकांना सतावत आहेत.



















