सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०९.११.२०२०.
फलटण- नगर परिषद हद्दीत मलनिस्सारण (भुयारी गटर) योजना कामाचे पाईप लाईनचे काम शहरात सुरु असून सर्व भागातील रस्ते पाईप लाईन टाकणेसाठी उकरलेले असलेने रस्ते उकरताना दुरुस्ती लक्षात न घेता संपूर्ण शहर उकरणेचे काम चालू आहे. संपूर्ण पावसाळ्यात या रस्त्यांमुळे फलटणकर ज्येष्ठ नागरीक यांचे प्रचंड हाल झाले तर काहीजण अपघात होवून जखमी झाल्याने दि.२ नोव्हेंबर रोजी सर्व पक्षीय यांच्यावतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देवून सात दिवसात शहरातील रस्ते दुरुस्त करावेत व खोदलेल्या चार्यामध्ये डांबरीकरणाचे पॅचवर्क करावे असे निवेदन देवून अद्याप नगर परिषदेने कोणतीही कारवाई न केल्याने नाईलाजास्तव सोमवार दि. ९ नोव्हेंबर रोजी फलटण नगर परिषद कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
धरणे आंदोलनामध्ये विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, गटनेते व नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, सचिन सुर्यवंशी (बेडके), महेंद्र सुर्यवंशी (बेडके), भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, सुशांत निंबाळकर, अनुप शहा, शहराध्यक्ष अमोल सस्ते, भाजपा ओबीसी शहराध्यक्ष राजेश शिंदे, डॉ. प्रविण आगवणे, पंकज पवार, सौ. मदलता कुंभार, सौ. मिना नेवसे, श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर, सौ. ज्योती खरात, मंगेश आगवणे, लक्ष्मण अहिवळे, तेजस काकडे, सादीक कुरेशी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष यादवकुमार जाधव यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली फलटण शहरात भुयारी गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले असून शहराच्या विविध पेठा व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खुदाई चालू करण्यात आली आहे. त्याचा प्रचंड त्रास पादचारी व वाहतूकदार आणि व्यापार्यांना होत आहे. रस्ता खुदाई केल्यानंतर व काम वेळेत पूर्ण होताच रस्त्याचे पॅच वर्क करण्याची जबाबदारी ठेकेदार लक्ष्मी इंजिनीअरिंग कंपनीची असून त्याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही, उलट दोन वर्षापूर्वीपासून खोदलेल्या रस्त्यांचे पॅच वर्कही झाले नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरातील खोदण्यात आलेल्या सर्व रस्त्यांचे पॅच वर्क तात्काळ झाले पाहिज अन्यथा जोपर्यंत रस्तंची कामे सुरु होत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन सुरु राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



















