बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अमोल साखरे
दि.१७.०५.१९
बीड- लोकसभेचं मतदान संपलं आणि ओढ लागली ती निकालाची. शहरातील गल्ली असो, की गावकुसाचा कट्टा असो, ऑफिस असो की हॉस्पिटल, जिथं तिथं एकचं चर्चा आहे, २३ मे ला कोण निवडून येणार ? याच चर्चेमुळं आज राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष, बीड लोकसभेच्या निवडणुक निकालाकडे लागले आहे. २३ मे ला नेमकं काय होणार ? देशात विक्रमी मतांनी विजयी झालेल्या प्रीतम मुंडे, पुन्हा एकदा विक्रमी मतांनी निवडून येणार का ? की, राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे करणार प्रीतम मुंडे यांना चितपट .
राजकारणात बीड पुर्वी पासूनचं माहिर असल्याचे मानले जाते. राजकारण्यांसाठी मराठवाड्यातील बीड हे केंद्रबिंदू मानलं जातं. म्हणूनचं बीडच्या राजकारणाकडे राज्याचं लक्ष असतं. हा जिल्हा कधी कॉंग्रेसच्या बाजुने उभा राहिला, तर कधी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला, तर कधी डाव्या पक्षांना याच जिल्हयाने साथ दिल्याचे अनेकदा दिसून आले.
लोकसभा २०१९ : बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला, बीडमध्ये सर्वाधिक ३६ उमेदवार
मात्र,१९९५ नंतर जिल्हयाच्या राजकारणात बदल होत गेले. स्व. गोपीनाथराव मुंडे हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर, बीड जिल्हयातच काय मराठवाड्यासह राज्यात कमळ फुलत गेले. १९९५ नंतर भाजपाला सत्ता मिळाली नाही. त्यामुळे भाजपाला सत्तेविना संघर्ष करावा लागला. सत्ता नसली तरी बीड जिल्हयात स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे वर्चस्व कायम राहिले. स्व.मुंडे यांनी अनेकांना आमदार, खासदारक्या दिल्या. त्या ही सहज, ज्यांना गुलाल लागत नव्हता त्यांना देखील गुलाल लावला. इतकं मोठं राजकीय वलय त्याचं होतं. आणि हेच वलय हळूहळू राज्यासह देशात निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळालं.
बीड लोकसभेसाठी विनायक मेटेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर
मात्र, अपघातानंतर त्यांचं निधन झालं आणि पुन्हा नव्याने पोटनिवडणूक झाली. २०१४ च्या पोटनिवडणुकीत मुंडे कुटुंबातील प्रीतम मुंडे भाजपकडून उभ्या होत्या, तर राष्ट्रवादीने स्व.गोपीनाथ मुंडेंना श्रद्धांजली म्हणून उमेदवार दिला नाही. त्यामुळं प्रीतम मुंडे या देशात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आल्या, आणि विक्रम केला.
मात्र, आता या लोकसभा निवडणुकीला थोडं वेगळंच वळण आलं आहे. विकासावर आणि माणूस पाहून होणारी निवडणूक चक्क जातीवर होताना दिसून येत आहे. याला कारण अनेक असली तरी, सरकारकडून मराठा समाजाची झालेली दिशाभूल हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. एवढे मोर्चे निघून सुद्धा आजही विद्यार्थ्यांना आरक्षणासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळंचं की काय मराठा समाज भाजप सरकारवर नाराज असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण हे मराठा समाजाला सुटलं होतं, मात्र, पंकजा मुंडे यांनी आपल्या ताब्यात जिल्हा परिषद घेत मराठा समाजाच्या अध्यक्षपदाच्या जागेवर वंजारी समाजाच्या सविता गोल्हार बसवल्या. यामुळं मराठा समाजात तीव्र रोषाची भावना दिसून येत आहे.



















