नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,महेश दारुंटे
दि.१२.११.१९
येवला- आठवाड्यापेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेल्या पिकांचे नुकसान पंचनामे पूर्ण होत आले. सोमवार पर्यंत ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसानीचे पंचनामे झाले आहे, पंचनामे झाले तरीही नुकसानीची अद्यापही अस्पष्टता असल्याने शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या हंगामाच्या भांडवलाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. त्यामुळे पंचनामे तर झाले, मदत केव्हा देता हेच बोला अशा संतापाच्या स्वरूपात शेतकरी अधिकारी व नेत्यांना प्रश्न विचारू लागले.
परतीच्या पावसाने तालुक्याला खरीप हंगामाचे बारा वाजविले आहे. हाताशी आलेल्या मकाचे सरासरी ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. शिवाय लाल कांदा व उन्हाळ कांद्याची रोपे तर शेतातच खराब झाली. अशी अवस्था बाजरीची सुद्धा झाली. कापूस पिकालाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अवकाळी जोरदार पावसाने दिला आहे. कपाशीची पत्ती गळून पडल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने पूर्ण करीत आणले आहे. तालुक्यातील तब्बल ४३ हजार बाधित शेतकऱ्यांचे आतापर्यंत पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यात खरीप पिकामधील बाजरी,तूर, ज्वारी, नागली, मुग, उडीद, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे ६९ हजार १९१ हेक्टर वरती पेरणी झाली. याशिवाय सुमारे सात हजार हेक्टर वर कांद्याची लागवड झाली. यांच्यातील काही पिके पावसापूर्वी काढली, तर काहींचे नुकसान झालेले नाही. त्यामुळे साधारण ५० हजार हेक्टर च्या आसपास क्षेत्र परतीच्या पावसामुळे बाधित झालेले आहेत.
विमाधारक व बिनविमाधारक या प्रकारात वर्गीकरण करून पंचनामे केले आहेत. आतापर्यंत ४२ हजार ६६४ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ४०८ हेक्टर वरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. या पंचनाम्यात काही शेतकऱ्यांचे ४५ ते ६० तर काही शेतकऱ्यांचे पूर्ण १०० टक्के नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे केल्याने भरपाई मिळेल व त्या पैशावर पुढील पिके उभारू अशी अपेक्षा ठेवलेल्या शेतकऱ्यांचा मात्र सत्तेच्या खेळात भ्रमनिरास झालेला दिसतो आहे. अजून देखील नवीन सरकार नसल्याने सरकार केव्हा येणार नी नुकसानीची भरपाई मिळणार केव्हा. याची शेतकऱ्यांना मात्र प्रतीक्षा असून संतापही व्यक्त होत आहे.



















