कळंब तालुक्यात चौदा ग्रामसेवकांची पदे रिक्त! चौऱ्यानव गावाचा कारोभार त्रेसष्ठ ग्रामसेवकावर!! विकास कामावर परिणाम !!!
उस्मानाबाद (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, वसीम सय्यद
उस्मानाबाद- जिल्ह्यातील कळंब तालुक्यात गावपातळीवर एक्यानव ग्रामपंचायती असून, त्यात त्रेसष्ट ग्रामसेवक काम करीत आहेत. तालुक्यासाठी एकूण सत्याहत्तर ग्रामसेवकांची पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी तीन ग्रामसेवक निलंबीत असून, अकरा जागा रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवनावर व विकासकामावर विपरीत परिणाम होत आसल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्वराज्यसंस्था देशात राबवली पाहिजे, हे गांधीजींचे स्वप्न होते. खेड्याचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल. या ध्येयाने प्रेरित होऊन पंचायत राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात १ मे १९६२ मध्ये पंचायतराजची स्थापना केली. त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेतील ग्रामपंचायत स्तरावर गावपातळीवर ग्रामसेवक पदाची निर्मिती करण्यात आली. गावचा सेवकमित्र म्हणून त्याची गणना होऊ लागली. गावातील भूमिहीन , शेतमजूर, कारागीर या सर्वाना परिचित व समस्या जाणुन घेणारा कर्मचारी म्हणून त्यांची नोंद झाली.
१९६२ ते १९८० पर्यंत ग्रामपंचायतीचे कामे मर्यादित स्वरूपाचे होते. परंतू १९८१ नंतर शासनाने ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक विषमता दूर करण्यासाठी ग्रामपातळीवर विविध योजना कार्यान्वित केल्या. त्या योजना ग्रामस्तरापर्यंत पोंहचवण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर सोपवण्यात आली. तसेच घरपट्टी वसूली, नळपाणीपुरवठा योजना, जन्ममृत्यूची नोंदणी, शिक्षणविषयक कामे, घरकुल योजना, दारिद्री निर्मूलन, पाणी शुद्धीकरण, विशेष घटक, महिला बालकल्याण, समाजकल्याण ईत्यादी योजना गावपातळीवर राबवाव्या लागतात. त्यातच तालुका स्तरावर आढावा बैठका, जिल्हा स्तरावर आढावा बैठाका यामुळे ग्रामसेवकावर कामाचा ताण पडत आसल्याचे दिसून येत आहे.
दोन ग्रामपंचायतीस एक ग्रामसेवक असल्याने विकासकामावर याचा दुरगामी परीणाम होत आहे; पण ग्रामसेवकांतही ताणतणाव निर्माण होत आसल्याचे पाहण्यास मिळत आहे. तरी राज्य सरकारने सकारात्मक दृष्टीकोण बाळगून रिक्त जागांची त्वरित भरती करावी . असी मागणी तालुक्यातील अभ्यासकासह जानकारातून केली जात आहे.



















