सोलापुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.०१.२०२०
माळशिरस- छ.शिवाजी महाराज व फुले,शाहू,आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात प्रजासत्ताकदिनी काही जातीयवादी लोकांनी एक निंदणीय घटना घडवून आणली आहे. प्रजासताकदिनी माळशिरस तालुक्यातील तांबवे गावच्या सरपंचालाच ग्रामपंचायत समोरील झेंडा वंदन करण्यास काही जातीयवादी लोकांनी विरोध केल्याने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणातील संबधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी दक्षता कमिटीचे माळशिरस तालुका सदस्य विकास धाईंजे, सरपंच ज्ञानू शंकर भोसले यांच्यासह तालुक्यातील वंचित बहूजन आघाडी व संघटनांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की माळशिरस तालुक्यातील तांबवे या गावाची लोकसंख्या साधारण ३ हजाराच्या आसपास आहे. २०१५ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ज्ञानु शंकर भोसले यांची राखीव (SC) जागेनुसार सरपंचपदी निवड झाली होती. मात्र त्यांनी कारभार स्वीकारल्यापासून त्यांना सरपंच असल्याचे या जातीवादी लोकांनी कधी भासूच दिले नाही. सरपंच झाल्यानंतर काही दिवस त्यांना सरपंचाच्या खुर्चीवरही बसण्यास विरोध करण्यात आला होता. २६ जानेवारीला झालेल्या ७१ व्या प्रजासत्ताकदिनी तर चक्क सरपंचाला झेंडावंदन करण्यापासूनच रोखण्यात आले. जर असे असेल तर सामान्य नागरिकांना या जातीयवाद्यांपासून किती त्रास सोसावा लागत असेल असे मत दक्षता कमिटिचे विकास धाईंजे यांनी निर्भिड पत्रकार प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. सदरील घटने संदर्भात सरपंच ज्ञानू शंकर भोसले यांनी गटविकास अधिकारी व पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे न्याय मागितला असून गटविकासाधिकार्यांचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पोलिसाधिकारी कठोर कारवाई करतीलच परंतु तात्काळ कार्यवाही न झाल्यास या प्रकरणास जो कोणी संबंधित दिसेल तिथेच त्याच्या तोंडाला काळे फासून त्याची धिंड काढू अशा तीव्र शब्दात विकास धाईंजे यांनी सदर घटनेचा निषेध केला आहे.



















