औरंगाबाद(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०३.२०२०
वैजापूर- प्रेम प्रकरणातून मुलगी व मुलगा पळून जाऊन लग्न केल्याच्या संशयावरून देविदास छगन देवकर, रोहिदास छगन देवकर या दोन भावांनी आपल्या साथीदारांसह तरुणाच्या अल्पवयीन भावाचा तीक्ष्ण हत्याराने खून आणि त्याच्या आई वडिलांना गंभीर जखमी केल्याची घटना (दि.१४) शनिवारी रात्री तालुक्यातील लाख खंडाळा येथे घडली आहे. भीमराज बाळासाहेब गायकवाड (वय १७) असे मृताचे नाव असुन त्याची आई अलकाबाई बाळासाहेब गायकवाड (वय ४१) वडील बाळासाहेब गंगाधर गायकवाड (वय ४१) हे दोघे गंभीर जखमी आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गायकवाड यांच्या नातलगासह आंबेडकरी चळवळीतील कार्येकर्ते संतप्त झाले आहेत. हल्ल्यापुर्वी आरोपींनी त्यांच्या घरातील सामान तालुक्यातील एक नातलगाच्या घरी रवाना करून हत्याकांड घडवून आणले आहे. या कटात आरोपींची संख्या अधिक असुन पोलिसांनी केवळ दोनच आरोपीना अटक केले आहे. या कटातील सर्व आरोपींना त्वरित अटक करा अशी भूमिका राजेंद्र बागुल, रिपाईचे तालुका अध्यक्ष साहेबराव पडवळ,बसपाचे बाबासाहेब पगारे, शहर अध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन यांनी घेतली होती, उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर, पो.नि.अनंत कुलकर्णी, अमोल ढाकणे, संजय घुगे यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतला.सदर घटनेत प्रेम पीडित कुटुंबातील मुलगा हा बौद्ध धर्मीय असून हल्लेखोर हे माळी समाजातील असून त्यांची शेतजमीन शेजारी शेजारी लागून असल्याने ते जवळच्या अंतरावर राहतात.बौद्ध मुलाने माळी जातीच्या मुलीशी प्रेम विवाह केल्याने हा हल्ला झाल्याचे समोर येत आहे.
सदर प्रकार हा संतापजनक,चीड आणणारा असून माणुसकीला काळींबा फासणारा आहे.असे परखड मत बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी व्यक्त केले असून सर्व आरोपींना पोलिसांनी त्वरित अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा संघटना राज्यभर तीव्र
आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.एकीकडे आंतरजातीय विवाह व्हावेत म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनुदान देत आहे तर दुसरीकडे मनुवादी निष्पाप जीवांच्या जीवाशी खेळत आहेत.संबधित प्रकरणी पीडित मुलगी व मुलाचा सरकारने शोध घ्यावा आणि त्यांना कडक पोलीस संरक्षण देऊन त्यांचे पुनवर्सन करावे.गृहमंत्र्यांनी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष देऊन अनुसूचित जातींवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी देखील किरण शिंदे यांनी केली आहे.



















