नाशिक(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०६.११.२०२०
● येवला तालुक्यात विविध विकासकामांना प्रारंभ
नाशिक- शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विखरणी विद्युत उपकेंद्र ते आंबेगांव स्वतंत्र ११ केव्हीए वाहीनी उभारणीसह स्पेशल डिझाईन ट्रान्सरफार्मरमुळे शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते येवला तालुक्यातील आंबेगांव येथे अद्यावत ट्रान्सफॉर्मर बसविणे आणि मुलभूत सुविधा अंतर्गत मारुती मंदिरासमोर १० लक्ष रुपये किंमतीचे पेव्हरब्लॉक बसविणे कामाचे भुमीपूजन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कृषी सभापती संजय बनकर, मुंबई बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस.ए.तडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनाग्रा, कार्यकारी अभियंता एस.एम.पाटील, यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी श्री भुजबळ यांच्या हस्ते स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर आणि पेव्हरब्लॉक बसविणे संदर्भातील कामांचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले.
पुढे बोलताना पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले, शेतकऱ्यांना सर्वाधिक आवश्यकता वीजेची असते. वीज मिळाली तर शेतकरी शेतीतून पीक मोठया प्रमाणावर उत्पादन करू शकतो. साधारण पणे ६५० ग्राहकांना या अद्ययावत विजेच्या वाहिनीचा फायदा होणार आहे. कांद्याच्या दराबाबत केंद्र सरकारने एफआरपीने कांद्याची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित संकटे असतात. आपण दोहोंवर मात करन्याचा कटाक्षाने प्रयत्न करू. कोरोनाची तीव्रता कमी झालेली आहे मात्र कोरोनाचा विषाणू अजून संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. थोड्याच दिवसात दिवाळीचा उत्सव सुरू होत आहे; नागरिकांनी फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करावी असे आवाहन देखील पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी केले. यानंतर पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी राज्य महामार्ग २५ ते येवला तालुक्यातील निळखेडा रस्त्याची सुधारणा करण्याच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन केले.



















