नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०१.२०२०
नाशिक- नाशिकच्या कळवन मालेगाव रोडवर झालेल्या भीषण अपघातात तब्बल २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अनेकांच्या घरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन सख्खा भावांचा मृत्यू झाला असून दोघांच्या पत्नी बचावल्या असल्याची बातमी समोर येत आहे.
चुलत भावजयीच्या अंत्यविधीवरुन परत येताना निकम बंधूंवर काळाने घाला घातला आहे. बाळासाहेब चिंधा निकम आणि त्यांचे धाकटे बंधू शांताराम चिंधा निकम हे सलून व्यावसायिक आहेत. या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला आहे. अंत्यविधी आटोपल्यानंतर निकम कुटुंब कळवणला यायला निघालं होतं. त्यावेळी बसच्या अपघातामध्ये दोन भावांचा जीव गेला पण दोन्ही भावजया बचावल्या आहेत.
दरम्यान, या अपघातात मालेगाव येथील अन्सारी कुटुंबातील ८ जण मयत झाले आहे. मालेगावहून कळवनकडे जाणारी कळवण आगाराची ही बस होती. बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तितक्या बससमोर आलेल्या रिक्षावर धडक बसली. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडली. यात ऍपे रिक्षातील ९ आणि बसमधील ४८ प्रवासी अडकले होते.
या अपघातात मालेगाव येथील अन्सारी कुटुंबातील ८ जण मयत झाले आहे. हे कुटुंब आपल्या परिवारातील मुलासाठी मुलगी बघण्याच्या अर्थात लग्न जमवण्यासाठी देवळा इथे आले होते. तो कार्यक्रम आटपून परततत असताना त्यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. संपूर्ण कुटुंबाच्या अशा जाण्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर वैवाहिक जीवन सुरू होण्याआधीच तरुणाचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
या भीषण अपघातामध्ये मृत प्रवाशांची संख्या २५ गेली असून अद्याप काही जण अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अद्यापही घटनास्तळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. प्रवाशांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. बसची मागील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ५ क्रेनच्या मदतीने विहिरीतून बस बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं.



















