बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अमोल साखरे
दि.१४.०६.१९
आष्टी- दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याला अस्मानीसह सुलतानी संकटाने ग्रासले असून गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात ७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. पिण्याचे पाणी नाही, जनावरांना मुबलक चारा नाही, छावण्यांमध्येही मोठमोठे घोळ आणि त्यात आता पाऊस आला तर पेरणीचे ओझे आणि नाही आला तर….. आणि सरकारचा नुसता घोषणांचा पाऊस!
याचाच विचार करून आज सरकार दरबारी शेतकऱ्यांना पेरणीसाठी हेक्टरी २५००० रुपये मदत द्यावी, प्रलंबित पीकविमा त्वरित वाटप करावा, पाण्याचे टँकर्स वाटप केवळ जीपीएस डिव्हाईसची पळवापळवी न करता नियमित व भ्रष्टाचार मुक्त सुरू राहावेत, विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय शुल्क माफ करून प्रवासही मोफत असावा, तूर-हरभरा खरेदीची देयके तात्काळ अदा करावीत, आष्टी मतदारसंघात MREGS अंतर्गत बंद कामे सुरू करावीत, ८३० मंजूर विहिरींचे वाटप प्रतीक्षा यादी व नियमानुसारच व्हावे, फळबागांची नोंद सात बाऱ्यावर घेतली जावी यांसह आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन श्रीमती थेऊरकर मॅडम यांना तहसील कार्यालय आष्टी येथे देण्यात आले. या पावसाळी अधिवेशनात पूर्ण मागण्या निकाली न लावल्यास तीव्र आंदोलन उभे करू असा इशाराही या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजी काका राऊत, आष्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब तात्या चौधरी, इंदिरा काँग्रेस मतदार संघाचे नेते रवींद्र काका ढोबळे, राष्ट्रवादी युवक कांग्रेस आष्टी तालुकाध्यक्ष पोपटराव गर्जे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष दादासाहेब गव्हाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव नाकाडे, तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.



















