सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३१.०१.२०२०
महाबळेश्वर- महाबळेश्वर पोलादपुर रोडवर मौजे मेटतळे गावच्या हद्दीत महिन्या पूर्वी आरची डिसुझा नावाच्या मुंबईच्या बिल्डरने वृक्षतोडीचा सपाटा लावला आहे.दाट जंगल नष्ट करून त्याने स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी जमीन मोकळी करण्याचा सपाटाच लावला आहे.आधीच त्याने केलेले सर्व बांधकाम हे अनधिकृत असून हरित लवादासमोर त्याची सुनावणी प्रलंबित आहे.अजूनही अनधिकृत बांधकाम चालूच असून तहसील कार्यालय गांधारीच्या भूमिकेत आहे.

याच मेटतळे गावात महाजन व पाटील या धनिकांनी आपल्या मिळकतीमध्ये असलेले दाट जंगल संपविण्यासाठी वणवा लावून अतिशय क्रूरपणे, अमानवीय रित्या जंगलतोड केली आहे.या प्रकाराने परिसरात अतिशय रोष निर्माण झाला आहे.मेटतळ्यातील या धनिकांनी वृक्षतोडण्यासाठी खास काही कामगार कामाला ठेऊन रोजच वृक्षतोडीचा धडाका लावला आहे.बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण गोरखनाथ शिंदे.यांनी दि.०४.०१.२०२० रोजी या निंदनीय वृक्षतोडीची माहिती प्रत्यक्ष भेट देऊन व लेखी पत्राने तहसीलदार महाबळेश्वर यांना कळवली असुन त्यानंतर प्रत्यक्ष भेट देऊन अनेकदा या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.परंतु तहसील कार्यालया कडून अद्याप कसलीच कारवाई झाली नसल्याने तहसील कार्यालय व स्वतः तहसीलदार या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेच लक्षात येत आहे.एरवी स्थानिकांनी एखादी छोटी फांदी तोडली तरी आकांड तांडव करणारे तहसील कार्यालय शेकडो झाडे तोडली तरी का गप्प आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे.या पाठीमागे मोठे आर्थिक कारण असल्याचे नागरिक बोलत आहेत.
तहसीलदार कार्यालयाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहावे व संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा महाबळेश्वरची वनसंपदा वाचविण्यासाठी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा किरण शिंदे यांनी आपल्या पत्रातून तहसील कार्यालयास दिला आहे.एक महिन्यापूर्वी पुराव्यानिशी माहिती देऊनही जर प्रशासन कसलीच कारवाई करणार नसेल तर अचानक होणारी वृक्षतोड,गौण खनिज उत्खनन,वाळू उपसा या प्रश्नांबाबत प्रशासन काय कारवाई करेल असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत.या प्रकरणी तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई होईल का असा प्रश्न जाणकार नागरिक विचारीत आहेत.




















