दमदाटी करणाऱ्या रिकव्हरी एजंटांविरुद्ध तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार करा – आयुक्तांचे नागरिकांना आवाहन
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क, प्रतिनिधी, देवम्मा ददली
दि.३०.०४.२०२६
पुणे- कर्जवसुलीच्या नावाखाली काही रिकव्हरी एजंटांकडून नागरिकांना दमदाटी, मानसिक छळ व बेकायदेशीर दबाव टाकण्याच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. अशा प्रकारांना बळी न पडता नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आयुक्तांनी सांगितले की, कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेच्या वतीने काम करणाऱ्या रिकव्हरी एजंटांना कायद्याच्या चौकटीत राहूनच वसुली करावी लागते. कोणालाही धमकावणे, घरावर येऊन गैरवर्तन करणे, अपमानास्पद भाषा वापरणे किंवा कुटुंबीयांना त्रास देणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित एजंटांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
नागरिकांनी अशा प्रकारच्या धमक्या किंवा त्रासाचा सामना करावा लागत असल्यास त्याचे ऑडिओ-व्हिडिओ पुरावे जतन करून ठेवावेत व पोलीसांकडे सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले. तसेच, कोणत्याही दबावाखाली येऊन आर्थिक व्यवहार करू नयेत, असेही सांगण्यात आले आहे.
पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, अशा बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.



















