पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०६.१९
दापोडी- दापोडी येथिल त्रैलोक्य बुद्धविहार जवळील नदीकाठी भराव येत असल्यामुळे पावसाळ्यात या परिसरात पुराचे पाणी शिरण्याची भिती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी आतापर्यंत याबाबत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखिल कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दापोडीमधील राजा हरिशचंद्र रोड रस्त्याजवळ बुद्ध विहार आहे.२६ जुलै व २ ऑगस्ट २००५ साली मोठा पाऊस झाला होता.त्यावेळी नदीतील पाणी या परिसरात घुसले.नदीकाठी मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे पाण्याचा प्रवाह अडला होता.त्याचा फटका या परिसरातील नागरिकांना बसला होता.
नदीतील राडारोडा आणि महापालिकेने उद्यान विकसित करण्यासाठी टाकलेला भराव यामुळे या परिसरात पावसाळ्यात नदीतील पाण्याचा धोका मोठया प्रमाणात निर्माण झाला आहे.महापालिकेने हा परिसर सुरक्षित करण्यासाठी नदीकाठच्या परिसरात संरक्षक भिंत बांधण्याची मागणी त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहायक गण या संस्थेने गेल्यावर्षी जून महिन्यामध्ये महापालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र महापालिकेने त्याबाबत अद्यापही कोणतीही ठोस पावले उचलली नसल्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांच्या अडचणीत भर पडणार आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले नदी पात्रात भराव टाकण्याचे प्रकार होत असल्यास त्या ठिकाणाची पाहणी करून प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल.नदी सुधार प्रकल्पामध्ये या बाबतीत गांभीर्याने दखल घेण्यात येणार आहे.



















