सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१९.०६.२०२०
महाबळेश्वर- महाराष्ट्राचे नंदनवन, स्वप्ननगरी,महाराष्ट्राचे चेरापुंजी, महाराष्ट्राचा मुकुटमणी, मिनी काश्मीर, पृथ्वीवरील स्वर्ग अशी अनेक विषशने ज्या महाबळेश्वरसाठी वापरली जातात त्या महाबळेश्वरची जगप्रसिद्ध सदाहरित जंगले अस्तित्वात राहतील की नाही हा प्रश्न सध्या महाबळेश्वरमध्ये खुलेआम, राजरोसपणे, बेसुमार, बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे ती पाहून स्थानिकांना पडला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की,
महाबळेश्वर पासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर महाड रोडला लागून मौजे मेटतळे हे गाव आहे.या गावामध्ये अनेक धनिकांनी मोठ्याप्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केले आहे. हे काम करण्यासाठी त्यांनी अनेक वृक्षांचा बळी देखील घेतला आहे.या बेकायदेशीर बांधकामांचे वाद हरित लवाद यांच्यासमोर प्रलंबित आहेत.त्यामध्ये आरची डिसुझा या मुंबईच्या बिल्डरची प्रॉपर्टी देखील आहे.या प्रॉपर्टीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये वृक्षतोड करून पक्क्या भिंतीचे (वॉल कंपाउंड)बांधले जात असून ते काम तात्काळ थांबवावे तसेच सदरची वॉल कंपाउंड तात्काळ हटवावी त्याने वन्य प्राण्यांच्या मुक्त संचारास अडथळा होत आहे.संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाची मागणी करणारे पत्र बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या संघटनेने तहसीलदार महाबळेश्वर यांना दि.०६ जाने.२०२० रोजी दिले होते. या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करण्याची विनंती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण गोरखनाथ शिंदे यांनी तहसील कार्यालयास अनेकदा भेट देऊन केली होती. परंतु तहसीलदार कार्यालयाकडुन या प्रकरणी कोणतीच कारवाई झाली नाही. याच वेळी मौजे मेटतळे येथेच महाजन व पाटील यांनी देखील आपल्या प्रॉपर्टी मध्ये असणारे वृक्ष वणवा लावून तोडले आहेत व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेने त्याच दिवशी केली होती.वेळोवेळी प्रत्यक्ष भेट देऊन देखील दोन्ही प्रकरणात तहसील कार्यालयाने कोणतीच कारवाई केली नाही.दरम्यानच्या काळात डिसुझा याने आपल्या प्रॉपर्टीला पक्क्या भिंतीचे कुंपण करून घेतले. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये कोरोनाचे संकट देशाच्या समोर उभे ठाकले.या दोन जागामालकांवर तहसील कार्यालयाकडून कसलीच कारवाई होत नाही हे पाहून त्यांचेच समोर असलेल्या मोरे या जागामालकाने आपल्या साथीदाराच्या सहाय्याने आपल्या जागेत असलेले घनदाट जंगल बेकायदेशीर रित्या तोडून टाकले. यावेळी त्याने शेकडो झाडांची कत्तल केली.त्याचेवर देखील कसलीच कारवाई अद्याप पर्यत झाली नाही म्हणून या घटनेची तक्रार देण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे हे तक्रार अर्ज घेऊन तहसीलदार सुषमा पाटील यांना भेटले व मेटतळे या गावात झालेल्या जंगलतोडीच्या प्रकरणी अद्याप कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आणले. यावेळी तहसीलदार सुषमा पाटील यांनी कोरोनाची कामे आम्ही करावीत की झाडे वाचवावीत असा अजब प्रश्न विचारला. सरकार कडून अजून सूचना मिळाल्या नाहीत. लॉक डाऊन हटल्यावर बघू असे उडवा उडवीचे उत्तर दिले. किरण शिंदे यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत अजून वृक्षतोडीची प्रकरणे घडतील त्यावर कारवाई होणार नाही का ? असा प्रश्न विचारला त्यावर तहसीलदारांनी असमर्थता दर्शविली. वास्तविक जानेवारी महिन्यात घडलेल्या घटनेवर अजून कारवाई न होणे हे दुर्दैव आहे. माणसांचा जीव महत्वाचा आहेच पण झाडे देखील तितकीच महत्वाची आहेत. मार्चपर्यन्त तहसील प्रशासन झोपले होते का असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.
खरे पाहता महाबळेश्वर हे नैसर्गिक दृष्टीने इको सेन्सेटीव्ही झोन म्हणून शासनाने घोषित केले आहे. येथील वनसंपदेचे रक्षण करणे हे शासनाचे व सर्वांचेच कर्तव्य आहे. पण कोरोनाच्या आडून जशी जंगतोड करणारे अपराधी अपराध करत आहेत तसेच यासारखे निष्क्रिय, मुजोर अधिकारी आपल्या कर्तव्यापासून पळ काढताना दिसत आहेत. किरण शिंदे यांनी “Save Mahableshwar” (महाबळेश्वर वाचवा) या नावाने मोहीम चालू केली आहे व महाबळेश्वरचे भवितव्य असलेले जंगल, पर्यावरण वाचविण्यासाठी आंदोलन उभारणार असल्याची घोषणा किरण शिंदे यांनी केली आहे. तसेच तहसीलदार सुषमा पाटील यांच्या या भूमिकेचा निषेध करीत असल्याचे म्हटले असून वरिष्ठांना भेटुन तहसीलदार सुषमा पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान मेटतळे या गावच्या वृक्षतोडीच्या व बेकायदेशीर बांधकामांच्या प्रकरणाकडे तहसीलदार यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याने जंगतोड करणारे धनिक मात्र अजून जंगलतोड करीतच असून बांधकाम देखील जोरात चालू आहे.मेटतळे गावातील आरची डिसुझा या मालकाने आता आपल्या जागेत कॉक्रीटच्या आरसीसी रस्त्याचे काम चालू केले असून त्यासाठी अजून वृक्षांचे बळी दिले आहेत. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाच्या या भोंगळ कारभाराने महाराष्ट्राची संपत्ती असलेले महाबळेश्वरचे संरक्षित जंगल वाचणार का हा प्रश्न मात्र नागरिक विचारू लागले आहेत.
यापूर्वी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांना सरकारने रेशनकार्डवर धान्य वाटप केले होते.याची माहिती विचारण्यासाठी आरपीआयचे पाचगणितील कार्यकर्ते अमोल कांबळे गेले होते तेव्हा याच तहसीलदारांनी त्यांच्याशी उद्धट वर्तन केले होते त्याची ऑनलाइन तक्रार केल्याचे कांबळे यांनी सांगितले आहे.



















