पुणे महानगरपालिकेत सावळा गोंधळ? आरोग्य विभागातील नियुक्त्यांवर प्रश्न चिन्ह..!
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.११.०३.२०२६
पुणे- महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील नियुक्त्यांवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वॉर्ड मेडिकल ऑफिसर पदांवर नियमबाह्य पद्धतीने अपात्र डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जगधणे यांनी केला आहे.
जगधणे यांनी सांगितले की, या नियुक्त्या करताना नियम आणि पात्रतेच्या अटींचे उल्लंघन करण्यात आले असून काही डॉक्टरांना नियमबाह्य पद्धतीने पदे देण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
या नियुक्त्या तातडीने रद्द करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. अन्यथा येत्या १५ दिवसांत या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या आरोपांमुळे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाकडून या प्रकरणावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



















