सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, शिवाजी भोसले
दि.१४.०३.२०२०
फलटण- कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सब यार्ड वाखरी (ढवळपाटी) येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.पेट्रोल पंप उभारणीच्या प्रत्यक्ष कामाचा भुमिपूजन समारंभ शिवजयंती (तिथीनुसार) च्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १२मार्च २०२० रोजी वाखरी (ढवळपाटी) येथे फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली तसेच मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा, व मा.श्री.दिपकराव चव्हाण, आमदार, फलटण-कोरेगांव विधानसभा मतदार संघ यांचे सहकार्यातून फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अन्नदाता सन्मान योजने अंतर्गत मार्केट यार्ड येथे शेतमालाची आवक आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विधायक व नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले जात आहेत. फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीला एकूण १२ पेट्रोल पंप मंजूर झाले असून त्यातील पहिल्या पेट्रोल पंपाच्या उभारणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. किसान कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पेट्रोल व डिझेल विक्री करण्याचा मानस असल्याचे व शेतकऱ्यांच्या उन्नती व सुविधांबाबत पाहिलेले स्वप्न सत्यात उतरत असल्याचे मा.श्रीमंत रघुनाथराजे (बाबा) यांनी सांगितले.
शेतकरी हा अन्नदाता आहे. सर्व जगाला अन्न पुरविण्याचे काम तो करतो आहे. शेतकऱ्याचे हे योगदान त्याचे हे काम देवापेक्षा कमी आहे असे मला वाटत नाही, म्हणून बाजार समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या प्रत्येक पेट्रोल व डिझेल आऊटलेटचे नाव हे अन्नदात्याचा योग्य तो सन्मान व्हावा व त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त व्हावी या हेतूने आवर्जुन कृषिदेव पेट्रोलियम हे नाव दिले असल्याचा उल्लेख मा.श्रीमंत रघुनाथराजे (बाबा) यांनी केला.
याबाबत अधिक माहिती देताना पुढे म्हणाले, फलटण-पुसेगाव रोडवर मौजे ताथवडा पर्यंत एकही पेट्रोल पंप नसल्याने या पंचक्रोशीतील ताथवडा, मानेवाडी, झडकबाईचीवाडी, उपळवे, तरडफ, मिरेवाडी, वाखरी, ढवळ इत्यादी गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होऊन वेळेची ही बचत होणार असून पर्यायाने वाखरी (ढवळपाटी) येथे मोठी बाजारपेठ निर्माण होणार आहे. सचिव व स्टाफ यांनी केलेले विशेष प्रयत्न, सर्व संचालक यांनी दिलेली खंबीर साथ यामुळेच हे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगीतले. शेतकऱ्यांना त्याच भागात शेतमाल विकता यावा याकरिता भुसार मार्केट व जनावरे बाजार, आठवडी बाजार लिलाव ओटे इत्यादी सुविधा लवकरच उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना समितीचे सचिव मा.श्री.शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले की, सदर पेट्रोल पंप उभारणीकामी विविध विभागांच्या NOC प्राप्त करणेबाबतचा खडतर प्रवास, पेट्रोल पंप मंजुरी, नाविन्यपूर्ण उपक्रमांचा प्रवास, त्याची तयार होत असलेली यशोगाथा थोडक्यात विशद केली.
हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे मा.श्री.संपत कोटीयान यांनी पेट्रोल पंप उभारणीची व कंपनी गुंतवणुकीची सविस्तर माहिती दिली. कंपनीकडुन या ठिकाणी जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगीतले.
याप्रसंगी बाजार समितीचे व्हाईस चेअरमन मा.श्री.भगवानराव होळकर, संचालक सर्वश्री मा.श्री.मोहनराव निंबाळकर, मा.श्री.बाळकृष्ण रणवरे, मा.श्री.प्रकाशराव भोंगळे, मा.श्री.विजयकुमार शेडगे, मा.श्री.संजयराव कदम, मा.श्री.बापूराव करे, मा.श्री.रामदास कदम, मा.श्री.चांगदेव खरात तसेच मा.श्री.राजीव नाईक निंबाळकर, मा.श्री.शिवाजीराव लंगुटे, पत्रकार बंधू आणि पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी, गाळेधारक व समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. समितीचे संचालक मा.श्री.विनायकराव पाटील यांनी धोम-बलकवडी चे माध्यमातुन झालेली जलक्रांती, उत्पादित शेतीमालाची पणन व्यवस्था व बाजार समितीच्या नाविन्यपुर्ण उपक्रमांची माहिती दिली व आभार मानले.



















