सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी, सुभाष जाधव
दि.२१.३.२०२०
फलटण- कोरोनाचा प्रादूभाव टाळण्यासाठी
तालुक्यातील अत्यावश्यक व्यतिरिक्त सर्व सेवा बंद केल्यानंतरही कमिन्स कंपनी व सर्व कारखाने व इतर मोठ्या संस्था बंद का नाहीत, याची सखोल चौकशी होऊन संबंधितावर सामान्यांप्रमाणे कडक कारवाई करून सदर कारखाने संस्था ३१ मार्च पर्यंत बंद ठेवाव्यात या मागणीसाठी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
आज संध्याकाळपर्यंत फलटण पोलीस व प्रशासनाने कमिन्स कंपनी बंद न केल्यास सुरवडी, निंभोरे, काळज, साखरवाडी परिसरातील नागरिक या कंपनीविरोधात एल्गार पुकारणार आहेत, असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
फलटण तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रासह राज्यशासन उपाययोजना करीत आहे. सातारा जिल्हा प्रशासनसुद्धा त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आहे. परंतू फलटणमधील राजकीय पुढार्यांच्या पाठबळामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी कंपनी मानल्या जाणार्या कमिन्स इंडिया लि. या सुरवडी, ता. फलटणमधील कंपनीमध्ये हजारो कामगारांसह अधिकार्यांचा राबता असल्यामुळे या परिसरातील सुरवडी, निंभोरे, काळज या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
‘गर्दी टाळा, कोरोनाला पळवा’ या सूत्रानुसार गर्दी टाळून एकमेकांच्या संपर्कात न येता कोरोना विषाणूची साखळी तोडता येणे शक्य आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार सूचना करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्वच संस्था कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्या आहेत. परंतू सुरवडी, ता. फलटण या गावच्या हद्दीत असलेली कमिन्स इंडिया लि. ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कंपनी याला मात्र अपवाद ठरत आहे. कराड, खंडाळा व वाई तालुक्यातील एमआयडीसीतील जवळपास सर्वच कंपन्यांनी आपले शटर डाऊन करीत वर्क फ्रॉम होम चा फॉर्म्युला राबविला आहे. मात्र, आज दुपारपर्यंत फलटण येथील कमिन्स कंपनीमधील उत्पादनाचे व कार्यालयीन कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु आहे. एका शिपमध्ये याठिकाणी सुमारे दोन ते तीन हजार कामगार काम करीत आहेत. यामध्ये स्थानिक कामगारांसह परराज्यातील व परदेशातील अधिकारीही याठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनालाही कमिन्स प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. कमिन्स कंपनीला कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत सर्वकाही माहित असूनही केवळ उत्पादन थांबू नये व त्याचा कंपनीच्या नफ्यावर कोणताही परिणाम होवू नये यासाठी कामगारांसह अधिकार्यांची काम करण्याची मानसिकता नसतानाही फलटणतालुक्यातील शक्तीशाली राजकीय पुढार्याच्या पाठबळामुळे फलटणमधील पोलिसांसह प्रशासनालाही खिशात ठेवून कमिन्स ने वर्क फ्रॉम कंपनी हा आपला दैनंदिन फॉर्म्युला सुरुच ठेवला आहे. कामगार व अधिकार्यांमध्ये दहशतीचे वातावरण असतानाही कमिन्समध्ये दडपशाहीचे वातावरण आहे, असा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. आज संध्याकाळपर्यंत फलटण पोलीस व प्रशासनाने कमिन्स कंपनी बंद न केल्यास सुरवडी, निंभोरे, काळज, साखरवाडी सासवड परिसरातील नागरिक या कंपनीविरोधात एल्गार पुकारणार असल्याचा इशारा, शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदीप झणझणे, स्वप्नील मुळीक, फलटण शहर प्रमुख रणजीत कदम, उपतालुका प्रमुख शिवाजी कोठावळे, अभिजित कदम, उपशहर प्रमुख राहुल पवार ,विभाग प्रमुख किसन यादव, रामचंद्र संकपाळ, नंदकुमार काकडे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.



















