आधुनिक भारताची उभारणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली.-डॉ सुखदेव थोरात.
पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०१.०४.२०२२
पुणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगप्रसिद्ध अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते त्यांनी कोलंबिया विद्यापीठातुन उच्च शिक्षण घेतले तदनंतर लंडन स्कूल आॕफ इकॉनॉमिक्स येथून ” दि प्रॉब्लेम ऑफ रुपी “हा ग्रंथ लिहून देशाच्या आर्थिक प्रश्नांची मांडणी सर्वप्रथम केली. देशाचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे. व्यक्ती, समाज व देशाची प्रगती होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ साली कामगार मंत्री, ऊर्जामंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून बाबासाहेबांनी केलेले काम आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वाचे ठरले. हीराकुड, भाक्रा नांगल इत्यादी बहुउद्देशीय प्रकल्पाची उभारणी केली. देशातील गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी जमिनीचे राष्ट्रीयीकरण करावे, शेतीसाठी पाणी, उद्योगधंदे ,ऊर्जानिर्मितीचे धोरण निश्चित केले, त्यामुळेच आधुनिक भारताच्या विकासाची उभारणी झाली असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष अर्थतज्ञ डॉ.सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने १ एप्रिल रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापना दिवसानिमित्त
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विकासाबाबतचे विचार व त्यांची प्रासंगिकता” या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन शुक्रवार दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी नेव्हिल वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सभागृह, पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुखदेव थोरात, अर्थतज्ञ, डॉ. किसन इंगोले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त समाज कल्याण, प्रमुख पाहुणे श्री धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी, पुणे, डॉ. मनोहर सानप, विश्वस्त, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे, डॉ. अभय हाके, विश्वस्त, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे, श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक, बार्टी, पुणे, श्रीमती वॄषाली शिंदे, उपायुक्त तथा विभाग प्रमुख, बार्टी, पुणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
परिसंवादात मनोगत व्यक्त करताना डॉ. सुखदेव थोरात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार मंत्री म्हणून कामगारांच्या हिताचे असंख्य निर्णय घेतले. बार्टी ही संस्था अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी कार्यरत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी देशाची उन्नती होणार असल्याचे स्पष्ट मत त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की बार्टी संस्थेने रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापनेचा दिवस साजरा करण्याचा चांगला उपक्रम केला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विचारवंत होते. देशाच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, स्टार्ट अप इंडिया अंतर्गत अनुसूचित जातीतील बेरोजगारांना त्यांच्या कुशलतेनुसार कर्ज उपलब्ध करून देता येईल याचा लाभ अनुसूचित जातीतील घटकाने घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
परिसंवादाचे प्रस्ताविक करताना बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये, म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतूनच १ एप्रिल १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली.
मानव जातीच्या उत्थानासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य केले. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला, खोती पद्धत बंद केली, शेतकऱी, कामगारांच्या न्याय हक्कांसाठी कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात केले तर देशात अमुलाग्र बदल घडेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.
डॉ. किसन इंगोले, यांनी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना या विषयी मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये, यांनी पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन केले.
या परिसंवाद कार्यक्रमाला बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी, नेव्हिल वाडिया कॉलेजमधील प्राध्यापक, अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांचा परिचय श्रीमती वॄषाली शिंदे, उपायुक्त तथा विभाग प्रमुख, बार्टी, पुणे यांनी करून दिला.
सूत्रसंचालन प्रा. प्रियदर्शनी हापसे, यांनी केले. उपस्थित विद्यार्थी, प्रमुख पाहुणे यांचे आभार श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक, बार्टी, पुणे यांनी मानले.



















