दिल्ली(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०३.२०२०
नवी दिल्ली- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूबाधित रुग्णांची देशातील संख्या ५० च्या वर गेली आहे. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती संबंधित राज्यांनी दिली आहे. कोरोना आजाराने जगभरात आतापर्यंत चार हजार लोकांचा बळी घेतला असून रुग्णांची संख्या सव्वा लाखाच्या घरात आहे.
चीनमधील वूहान प्रांतात सर्वप्रथम कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता. तेथून त्याचा जगभर प्रसार झाला. इटली, इराण, अमेरिका आदी देशात या आजाराने अनेक लोकांचे बळी घेतले आहेत. सुदैवाची बाब म्हणजे भारतात अजुनपर्यंत या रोगामुळे कोणी मरण पावलेले नाही. देशातील रुग्णांच्या संख्येत मात्र मागील काही दिवसात वाढ झाली आहे.
केरळमध्ये कोरोनाचे सहा नवे रुग्ण आढळून आले असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ वर गेली असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी मंगळवारी दिली. तीन बाधित रुग्णावर करून त्यांना सोडण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. कर्नाटकातील रुग्णांची संख्या एकवरून वाढून चारवर गेली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलू यांनी दिली. तामिळनाडूमध्ये ८ लोकांची चाचणी नकारात्मक आली असल्याचे या राज्याचे आरोग्य मंत्री सी. विजयभास्कर यांनी सांगितले. विषाणूबाधित ४५ वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.



















