सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.३.१२.१९
फलटण- राज्यामध्ये महायुतीच्या काळात पारदर्शक पध्दतीने महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षार्थीची भरती करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. गेल्या तीन वर्षांमध्ये या पोर्टलअंतर्गत होणारी प्रत्येक परीक्षा वादग्रस्त आणि खूप सारे प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. पारदर्शकतेच्या नावाखाली खुप मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याच्या अनेक घटना याआधी समोर आलेल्या आहेत. यापुर्वीही स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्यावतीने सदर महापोर्टल परिक्षा बंद करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आला होता.
आज पुणे येथील महापोर्टल केंद्रावर मोठा सावळा गोंधळ झाला असून सर्व्हर बंद व इतर तांत्रिक अडचणीने परिक्षा बंद पडली गेली आहे. यावेळी ही परिक्षा सुरू असताना अनेक विद्यार्थी गुगलवरती ॲानलाईन पाहून पेपर सोडवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातून विविध कानाकोप-यातून हजारो विद्यार्थी या परीक्षांसाठी आले होते. वास्तविक शासनाने ही परिक्षा त्याच्या जिल्ह्यांच्या ठिकाणी सेंटर देऊन परीक्षा घेणार होते. मात्र विद्यार्थ्यांनी ॲानलाईन फाॅर्म भरत असताना स्वत:च्या जिल्ह्यातील पर्याय केंद्र दिले असताना देखील त्यांना इतर सेंटर देऊन परीक्षा घेतली जात आहेत.
सदर पोर्टल हे भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकले असून राज्यभरातील तरूणाई हे पोर्टल बंद करावे म्हणून रस्त्यावर उतरत आहेत. एकच विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी परिक्षेस बसताना आढळले असून काही विशिष्ट परिक्षा केंद्रे असे सुध्दा आहेत कि जी पुर्णत: मॅनेज झालेली असल्याचे पुराव्यासहित तक्रारी आल्या आहेत. काही उमेदवार चुकीच्या पध्दतीने पैसे भरून सेवेमध्ये रूजू झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
या महापोर्टलच्या कार्यालय, अधिकारी व पदाधिकारी यांचा कोणताच पत्ता नसल्याने विद्यार्थ्यांना तक्रार करणे अडचणीचे झाले आहे. फडणवीस सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले हे पोर्टल मध्यप्रदेश राज्यातील व्यापम घोटाळ्यापेक्षाही हा मोठा घोटाळा असल्याची शक्यता वर्तविले जात आहे.



















