मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.११.०२.२०२०
मुंबई- राज्यातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दोन दिवसांत ५ वर पोहचली आहे. पुण्यातील दुबईहून परतलेल्या एकाच कुटुंबियांतील तिघांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील कोरोनाचा धक्कादायक आकडा समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (आज) बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बाबींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. आगामी आयपीएल स्पर्धेसंदर्भातही या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. यापूर्वी राजेश टोपे यांनी आयपीएल स्पर्धेला होणारी गर्दी पाहून स्पर्धा रद्द करण्यासंदर्भात बीसीसीआयशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल, ही भूमिका ठाम ठेवली होती. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री काय आदेश देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापूर्वी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पैठणमध्ये दरवर्षी आयोजित करण्यात येणारी ‘नाथषष्ठी’ यात्रा स्थगित करण्याचे आदेश दिले होते. देशातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारनेही खबरदारीचे उपाय म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन नागरिकांना केले होते. राज्यातील अनेक नेत्यांनी सार्वजनिक दौरे रद्द केले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौऱ्यातील शरयू आरतीचा कार्यक्रम रद्द केला होता. राज्यातील कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढल्यानंतर बुधवारी राज्य सरकार आणखी काही पाऊले उचलण्याची शक्यता आहे. या बैठकीत गावांगावांत होणाऱ्या यात्रा रद्द करण्याबाबतही आदेश काढले जाऊ शकतात.



















