रवी भिसे यांच्या “माझा निषेध झाला पाहिजे” कविता संग्रहाला पुरस्कार
सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०९.०८.२०२२
पाटण- तालुक्यातील युवा लेखक रवी भिसे यांच्या “माझा निषेध झाला पाहिजे” या काव्य संग्रहास नांदेडचा “कै.सौ. केवळबाई मिरेवाड” पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रभरातून आलेल्या 80 काव्य संग्रहातून रवी भिसे यांच्या “माझा निषेध झाला पाहिजे” या काव्य संग्रहाची निवड झाली आहे.
नांदेड येथील “मातोश्री कै.सौ. केवळबाई मिरेवाड” यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी साहित्यातील कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह आणि बालसाहित्य या विभागात दरवर्षी साहित्यिकांना पुरस्कार दिले जातात. कविता या प्रकारात रवी भिसे यांच्या ’माझा निषेध झाला पाहिजे’, आणि जळगाव येथील उषा हिंगोणेकर यांच्या ’धगधगते तळघर’ या काव्यसंग्रहाची राज्यभरातून निवड झाली आहे.
परिस पब्लिकेशन पुणे या प्रकाशना अंतर्गत ऑगस्ट 2021 ला “माझा निषेध झाला पाहिजे” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे..या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक, अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
या काव्य संग्रहाबद्दल सबनीस म्हणतात,
“हजारो कवी आहेत पण, स्वतःच्या मनाचे व व्यक्तित्वाचे चरित्र व चारित्र्य मानवी मूल्यांच्या निकषावर परखडपणे तपासून, स्वतःचा धिक्कार करणारी कविता मी फक्त रवी भिसे यांच्याच संदर्भात अनुभवली.”
पाटण तालुक्यातील हा कवी पुण्यासारख्या प्रतिभावानांच्या आणि साहित्यिकांच्या शहरात आपल्या लेखणीद्वारे गाव खेड्यातलं जगणं मांडतो आहे आणि साहित्यपंढरीत त्याला चांगली दाद देखील मिळत आहे. त्याचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे, तो वाचून अनेक साहित्यिकांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे. कवी लेखक हा आपल्या लेखणीतून समाजाचं दुखं मांडत असतो, आणि हेच शब्दभंडार समाजासाठी दिशादर्शक ठरत असतात. ‘माझा निषेध झाला पाहिजे’ या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता समाजघटक म्हणून आपल्याला प्रश्न विचारते आणि विचार करायला भाग पाडते.
पाटण तालुक्यातील हा युवा लेखक पुण्यातील चोखंदळ वाचकांना आपल्या साहित्य लेखणीतून आपली दखल घेण्यास भाग पाडत आहे.
या पुरस्काराचे संयोजक विरभद्र मिरेवाड तर साहित्यिक अशोक कोळी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
🔹
“कविता जगण्याचं भान देते, आणि कल्पनेच्या पलीकडचा विचार मांडून वाचकांना विचार करण्यास भाग पाडते. “माझा निषेध झाला पाहिजे”, यात असंच काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, पहिल्याच कवितासंग्रहाला मिळालेल्या या पुरस्कारामुळे खूप आनंदी आहे. आपण गांभिर्याने काही तरी लिहू पाहतो आणि वाचक त्याची दखल घेतात, तेव्हा खूप बरं वाटतं, मला लिहण्यासाठी प्रवृत्त करणारे प्रा.डॉ. ऐवळे सर, प्रा. विनायक राऊत सरांसारखे मार्गदर्शक मिळाले. त्यांच्या मुळेच आणि महाविद्यालयातील सकारात्मक वातावरणामुळे लिहिता झालो” माझ्या पहिल्याच साहित्याची दखल साहित्य विश्वाने घेतली आहे, या पुढे ही माणसाच्या जगण्याला वैचारिक हातभार लागेल असेच लिहीत राहीन.
रवी भिसे



















