मुंबई (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क ) प्रतिनिधी, मिलिंद जाधव
भिवंडी तालुक्यातील वाफाळे येथील कॉम्रेड आत्माराम विशे यांच्याकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने चमत्कार सादरीकरण आणि प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अंनिसने चमत्काराचे प्रात्यक्षिके दाखवत नागिरीकांचे प्रबोधन केले. यावेळी अंनिसच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष सुरेखा भापकर यांनी “स्त्रिया आणि अंधश्रद्धा” या विषयावर भाष्य करत प्रामुख्याने स्त्री मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धांना बळी का पडते, याची धार्मिक, सामाजिक अंगाने कारणमीमांसा त्यांनी मांडली. सावित्रीमाई फुले यांनी दाखविलेली स्त्रीशिक्षणाची वाट शिक्षणाचे महत्व पटवून दिले. केवल शिकून नोकऱ्या मिळविणे यापुरताच मर्यादित नसून आपल्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय आपल्याला घेता येणे, स्वतंत्रपणे विचार करता येणे व मांडता येणे हा स्वतंत्र व्यक्ती म्हणून अस्तित्वाची जाणीव व बरोबरीच्या दर्जाचे भान इथवर ती जाऊन पोहचते, हे पटवून दिले. आपण स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेत असू तर अंधश्रद्धा झुगारुन देऊन आपल्या अधिकारांसाठी पुरुषप्रधान संस्कृतीशी संघर्ष करण्याची तयारी आपण ठेवायला हवी, असे सांगत मार्गदर्शन केले. नागरिकांच्या भयग्रस्त मानसिकतेचा फायदा घेण्यासाठी त्यांच्यासमोर काही भगत, बुवा, मांत्रिक चमत्कार सादर करतात व त्याद्वारे नागरिकांमध्ये भीती घालून त्यांच्याकडून धार्मिक विधींच्या नावाखाली पैसे उकळतात. मुळात या चमत्कारांमागे एकतर रासायनिक अभिक्रिया असते किंवा निव्वळ हातचलाखी तरी असते असे सांगत किशोरी गरुड यांनी विविध चमत्कार दाखवून दिले व नागरिक अशा प्रकाराला बळी न पडता त्यामागील कारणांचा शोध घेण्याचे आवाहन त्यावेळी नागरिकांना केले. दारुबंदी, स्त्रीभ्रूणहत्या, लिंबू-मिरची, ग्रहांचे खडे यावर आपल्या प्रबोधमात्मक गाण्यांच्या माध्यमातून परखड भाष्य करत सामान्यतः आपल्या भोवताली पदोपदी दिसणाऱ्या अंधश्रद्धा, व्यसनं, स्त्रीला दिला जाणारा दुय्यम दर्जा यामुळे आपला समाज मागे पडत आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी शिक्षण, आरोग्य यासोबत वैज्ञानिक दृष्टिकोन व आधुनिक लोकशाही मूल्यांची जोड आपल्या विचारांना लाभली पाहिजे असे सांगत शाहीर एस. एस. शिदे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भोवताली व घराघरात दिसणाऱ्या स्त्री-पुरुष भेदभावाच्या मुद्यावर बोट ठेऊन पुरुषप्रधान व्यवस्थेला निर्भयपणे प्रश्न विचारत स्त्री-पुरुष समानता हे मूल्य मानता तर प्रथम घरातील स्त्रीचा बरोबरीचा दर्जा मान्य करा. तिचे स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे, मत व्यक्त करण्याचे, आवडीनिवडी जपण्याचे स्वातंत्र्य मान्य करा, असे दर्शना पालवी पाटील यांनी आपले मत मांडले. मिलिंद पाटील व कॉ. आत्माराम विशे यांनी वक्त्यांच्या मांडणीचा आशय व त्यांनी मांडलेल्या समतेच्या व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विचाराचे महत्व विशद करत प्रमुख पाहुण्याचे व उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.



















