सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.११.२०२०
फलटण- वीज महावितरणकडे शेती पंपावरील मीटर रिडींग घेण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही. सदर यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे अंदाजे, चुकीचे व बोगस मीटर रिडींग देऊन त्यावर वीजबील आकारले जाते. म्हणजे येणारे वीजबीलही पुर्णतः बोगस दिले जाते. ही शेतक-यांची एकप्रकारे फसवणूक आहे. हा कायद्याने गुन्हा आहे. बोगस वीजबीले देखील वर्षानुवर्षे पासुन शेतक-यांना वीज महावितरण देत नाही. मग वीजबीले थकली जातात. काही कालावधीनंतर केव्हा तरी डीपी जळतो किंवा चोरीला जातो त्यावेळी वीज महावितरण शेतक-यांची एकाएकी वीजबील भरणा करावा यासाठी अडवणुक करते. संबंधित डिपीवरील सर्व कनेक्शन धारक शेतकऱ्यांना कमीत कमी पाच हजार रुपये भरावेत यासाठी तकादा मागे लावते. त्याशिवाय डिपी देता येणार नाही असे सांगितले जाते. सर्व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती एकसारखी चांगली नसते. चारजण लगेच तयारही होतात, परंतु बाकीचे दहा जणांचे पैसे गोळा होईपर्यत महिना दीड महिना जातो. त्यामुळे दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होते. पाच हजारासाठी पाच लाखाचे नुकसान शेतकऱ्यांना भोगावे लागते. शेतकरी आत्महत्येचं हे देखील एक प्रबळ कारण आहे. दरम्यान होणारे आर्थिक, मानसिक व जिवीत नुकसान वीज महावितरणचा बाप भरुन देतो का? सरकारी कामात अडथळा आणला की गुन्हा दाखल होतो, मग शेतकरी कामात अडथळा आणल्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे असे शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
फलटण तालुका शिवसेनेकडे शेतकऱ्यांच्या प्रबळ तक्रारी वीज महावितरणविषयी आल्या आहेत. त्या कशा सोडवायच्या व वीज महावितरणवर कसे नियंत्रण ठेवायचे याचा विचार फलटण तालुका प्रशासनाने करावा. सोमवार (दि०२) रोजी वीज महावितरणमुळे फलटण तालुक्यातील पिडीत शेतकरी व फलटण तालुका शिवसेना यासंबंधी वीज महावितरणवर फलटण पोलीसांकडे गुन्हा दाखल करण्याविषयी निर्णय घेणार आहे. तसेच लाचलुचपत विभाग सातारा यांचेशीही संपर्क साधणार आहे. दरम्यान अजुनही वीज महावितरणने त्यांची यासंबंधीची योग्य भुमिका स्पष्ट करावी व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन शिवसेना फलटण शिवसेना तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी केले आहे.



















