सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.११.२०२०
शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही तर उद्रेक होईल- धनंजय महामुलकर
फलटण- केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयके रद्द करा यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर सह कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली फलटण नाना पाटील चौक येथे रास्तारोको करण्यात आला. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने राजू शेट्टी व व्ही.एम.सिंग यांनी केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात देशभर आंदोलनाची हाक दिली होती. देशभरातील शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून ‘स्वाभिमानी’ च्या वतीने फलटण येथील नाना पाटील चौक येथे रास्तारोको करण्यात केला. या रास्तारोको मध्ये शेतकरी विरोधी कृषी विधेयके सरकारने रद्द करावे, शेतकऱ्यांना किमान हे. २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, पिकविमा कंपन्यांना शेतकऱ्यांना १००% पिकविमा देण्यास सरकारने बाध्य करावे, कापसाची हमीभावांने खरेदी करण्यासाठी तात्काळ CCI चे खरेदी केंद्र चालू करावे, संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याची वस्तुनिष्ठ आणेवारी ५० पैशाच्या आत काढण्यात यावी,या मागण्या करण्यात आल्या. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नसून जर सदर मागण्यां मान्य झाल्या नाही तर मग शेतकऱ्यांच्या उद्रेकाला केंद्र व राज्य सरकारला सामोरे जावे लागेल. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यावेळी दिला. तब्बल एक तास झालेल्या या रास्तारोको मुळे फलटण तालुक्यातील नाना पाटील चौक येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलना दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी ‘स्वाभिमानी’चे जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुका अध्यक्ष नितीन यादव, फलटण तालुका युवक अध्यक्ष प्रमोद गाडे, फलटण तालुका शहराध्यक्ष सचिन खानविलकर, दादा जाधव, सुभाष जाधव, बाळासाहेब शिपकुले, विश्वनाथ यादव, पप्पू सत्रे, प्रल्हाद आहिवळे, पंकज आटपाडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.



















