सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.७.०१०.१९
सोलापूर- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे नाव घेण्याचे टाळले आहे. एप्रिल २०१९ मधे झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर शिंदे यांनी त्याच ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता ते विधानसभेच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरत आहेत. विधानसभेच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात शिंदे यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत सर्वच उमेदवारी आपल्याकडे होत्या. चांगल्या कामाची ही पावती होती. आपण निर्णय घेऊन लोकसभा लढवली. राष्ट्रवादीचा उल्लेख टाळत ते म्हणाले, “बागल गटाबरोबर एका पक्षाकडून निवडणूक लढवली. बागल गटाने चांगले काम केले.लोकसभा निवडणुकीवेळी शिंदे विधानसभेला मदत करतील, या भावनेनी बागल यांनी प्रमाणिक काम केले.”
निवडणुकीत शिंदेंचा पराभव झाल्यानंतर विधानसभेसाठी शिंदेच्या कार्यकर्त्यांनी हालचाली सुरु केल्या. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी सोडताना बागल यांचे कार्यकर्ते इतर कारणामधे हे एक कारण सांगत होते. बागल शिवसेनेत गेल्याने शिंदे यांचा राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते.मात्र त्यांनी राष्ट्रवादीला नाकारत अपक्षचा नारा दिला आहे. २०१४ च्या विधानसभेवेळी करमाळा मतदारसंघात संजय शिंदे, आमदार नारायण पाटील,रश्मी बागल, जयवंतराव जगताप यांच्यात प्रमुख लढत झाली होती. त्यात नारायण पाटील यांनी बाजी मारली होती. शिंदे यावेळी अपक्ष उतरत असल्याने नेमके काय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



















