चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.१०.१९
चिमूर- सप्टेंबर महिण्याच्या उत्तरार्धात सुरु झालेले शिक्षकांंचे विविध प्रशिक्षणे अॉक्टोबर महिण्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरुच होते. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांचा निकाल तयार करुन तो निकाल पुढील दहा दिवसांत अॉनलाईनही करायचा आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणूका घोषित होऊन शिक्षक कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण या सप्ताहात आहे. काही शिक्षकांना प्रशासनाने टपाल मतदान केंद्र, स्वीप जनजागृती अभियानात गुंतवले आहे. बीएलओचे काम तर शिक्षक शासनाच्या धाकाने करीतच आहेत.अशा परिस्थितीमध्ये प्रशिक्षणांमुळे शाळांत गंभीर स्थिती निर्माण होऊन दोन शिक्षकी शाळांत तर अतिशय बिकट परिस्थिती या प्रशिक्षणाच्या चुकीच्या नियोजनामुळे निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण गुणवत्ता विकास झाला पाहिजे, त्याच्यात अपेक्षित बदल झाले पाहिजे याकरिता शिक्षकांना वेळोवेळी अपडेट राहण्यास्तव विद्या प्राधिकरण विविध प्रशिक्षणांचे आयोजन करते. अभ्यासक्रम ठरवणे, बदलत असणाऱ्या अनेक शैक्षणिक बाबी शिक्षकांपर्यंत पोहचवणे या बाबी हे प्राधिकरण करित असते असे असतानाही इतर अनेक एनजीओंच्या माध्यमातून शिक्षकांवर विविध प्रशिक्षणे, परीक्षा लादल्या जात आहेत. एका माहितीनुसार एक एनजीओ एका जिल्ह्यातील ३० गावांचा आणि त्या गावांतील २० मुलांवर प्रयोग करते. त्यांची परीक्षा घेते आणि त्यांवर गुणवत्ता ठरवतात.जिल्ह्यातील ३० गावांतून आणि त्या गावांतील २० मुलांची तपासणी करुन मुलांची शैक्षणिक गुणवत्ता ही मंडळी कशी पडताळत असतील हा मोठा यक्षप्रश्न आहे! या पडताळणीनंतर ते आपला अहवाल शासनाला सादर करतात. त्या अहवालानंतर गुणवत्तेविषयी शिक्षकांवर कसे खापर फोडले जाते हे सगळ्यांनाच माहिती आहे. शिक्षक शाळेत कमी आणि प्रशिक्षणे, अशैक्षणिक कामे यांत जास्त व्यस्त असल्याचे वास्तव चित्र आहे.
● सुरेश तुकाराम डांगे, शिक्षक पं.स.चिमूर जि.चंद्रपूर
प्रशिक्षणा संदर्भातील एक मोबाईल ॲप्स डाऊनलोड करुन त्याची माहिती भरण्याबाबत प्रशिक्षणाचा संपूर्ण एक दिवस नियोजनात असणे ही अतिशय खेदाची बाब आहे. इतर दिवसांतही अशीच परिस्थिती कायम असल्याने ही प्रशिक्षणे कोणत्या कामाची असा प्रश्न शिक्षकांत निर्माण झाला आहे. शिक्षक अनेक अशैक्षणिक व अॉनलाईन कामांमुळे कमालीचा त्रस्त झाला असून आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना फक्त शिकवू द्यावे,ही आमची मागणी आहे.



















