सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०३.२०२०
• जिल्हाधिकार्यांसह पोलीस प्रमुखांनी लक्ष घालण्याची मागणी.
फलटण- जमावबंदी आदेश असतानाही जिल्ह्यात कार्यरत असणार्या अनेक फायनान्स कंपन्यांचे रेपो बॉयज् टोळक्याने सामान्यांच्या घरात घुसून जबरदस्तीने कर्जवसुली करीत असल्याने जिल्ह्यात प्रक्षुब्धतेची भावना निर्माण झाली आहे.
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारही या जिवघेण्या व्हायरसशी लढण्यास सज्ज आहे. कालच जनता कर्फ्यूच्या माध्यमातून देशातील नागरिकांनी एकजूट दाखवत कोरोनाला हरविण्याचा संकल्प केला. राज्यातील सर्वच सार्वजनिक व खाजगी संस्थाने बंद आहेत. असे असताना जिल्ह्यातील खासगी फायनान्स कंपन्यांनी मात्र मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यास सुरुवात केली आहे. जमावबंदी आदेश असतानाही जिल्ह्यात कार्यरत असणार्या अनेक फायनान्स कंपन्यांचे रेपो बॉयज् टोळक्याने सामान्यांच्या घरात घुसून जबरदस्तीने कर्जवसुली करीत असल्याने जिल्ह्यात प्रक्षुब्धतेची भावना निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सामाजिक तसेच खाजगी सेवा बंद करण्यात आल्या आहेत. चार किंवा पाचजणांच्या समूहाने एकत्र येवू नये यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांनी जमावबंदीचा आदेश जिल्ह्यात लागू केला आहे, मात्र या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून जिल्ह्यात कार्यरत असणार्या विविध फायनान्स व बचतगट कंपन्यांनी मात्र ऐन उन्हाळ्यात शिमगा करीत जिल्ह्यातील नागरिकांच्या घरात घुसून जबरदस्तीने कर्जवसुली चालवली आहे. वास्तविक प्रशानाने लोकांनी दैनंदिन कामासाठी वा रोजंदारीवर न जाता घरातच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लहान-मोठे व्यवसाय, हातावर पोट असणारे श्रमजीवी आपापल्या परिने कोरोनाशी लढत आहेत. त्यामुळे आर्थिक आमदनी ठप्प झाल्यामुळे सामान्य लोकांचे कंबरडे मोडलेले आहे. परंतू त्या लोकांनी विविध फायनान्स तसेच बचतगटांकडून कर्जे घेतलेली आहेत. मात्र सध्या सुरु असलेल्या कर्फ्यूमुळे ना लोक घराबाहेर जावू शकत ना, कामावर त्यामुळे या फायनान्स कंपन्यांना पैसे द्यायचे तरी कुठून? मात्र मार्चएंड च्या नावाखाली बँका, पतसंस्था, खाजगी फायनान्स तसेच बचतगट कंपन्यांनी जिल्ह्यात वसुलीच्या नावाखाली उच्छाद मांडला असून वसुलीसाठी दहा ते बाराजणांचे टोळके लोकांच्या घरात घुसून हप्त्यासाठी दमदाटी करीत आहेत. आधीच कोरोनाच्या भीतीमुळे पिचलेले लोक या फायनान्स कंपन्यांच्या रेपो बॉयज्मुळे हतबल झाले आहेत. पैसाच नाही, तर देणार कुठून? एकवेळ कोरोना परवडला, परंतू हे खाजगी फायनान्स कंपन्यांचे रेपो बॉयज् नको रे बाबा.. अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आज सकाळपासून फलटण तालुक्यात व लोणंदमध्ये खाजगी फायनान्स कंपन्यांच्या रेपो बॉयज्नी उच्छाद मांडला आहे. जिल्हाधिकारी सातारा यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही नियमावली लागू केली आहे, त्या नियमावलीची खाजगी कंपन्यांचे रेपो बॉयज् पायमल्ली करताना निष्पन्न झाले आहे. गोरगरीब लोक कोरोनाच्या भीतीने व संसर्ग टाळण्यासाठी आपापल्या घरात बसून शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करीत आहेत, मात्र हे रेपो बॉयज् लोकांच्या घरात घुसून कोरोनाचा संसर्ग पसरवू शकतात, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तत्काळ या प्रकरणात लक्ष घालून विविध खाजगी फायनान्स कंपन्यांच्या संबंधित रेपो बॉयज्वर कारवाई करावी, अशी मागणी साखरवाडी येथील काही ग्रामस्थांकडून केली आहे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अवैध खाजगी सावकारी- फायनान्स व बचतगट पीडित संघर्ष समितीचे अध्यक्ष आमीरभाई शेख, प्रदीप झणझणे, स्वप्नील मुळीक, इत्यादी यांनी केली आहे.



















