नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०५.२०२०
नाशिक- राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. या दरम्यान, एकत्रित जमून कुठलाही धार्मिक कार्यक्रम घेण्यास मनाई आहे. केंद्र व राज्य सरकारचे धोरण स्पष्ट असल्याने रमजान ईदची नमाज ईदगाह मैदानाऐवजी आपल्या घरातच अदा करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केले आहे. पुढील आठवड्यात रमजान ईदचा सण साजरा होत आहे. काही मुस्लिम संघटनांनी ईदच्या सामूहिक नमाज पठणाला परवानगी देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मुस्लिम धर्मगुरू व ईदगाह ट्रस्टीची बैठक घेतली. बैठकीत आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, मौलाना हमीद अब्दुल अझहरी, युसूफ इलियास यांनी परवानगी देण्याची मागणी केली. भावनांचा विचार करून सकाळी सात वाजेपर्यंत नमाज पठणासाठी वेळ देण्याची भूमिका मांडण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ. सिंह यांनी दारुल उलूम देवबंदच्या फतव्याची माहिती देत घरातचनमाज पठण करण्याच्या सूचना असल्याचे सांगितले. कामठी, भिवंडी व मुंब्रा येथेही अशी मागणी झालेली नाही. सर्वांनी सरकारच्या आदेशाचे पालन करत सहकार्य करावे, अशी विनंतीही डॉ. सिंह यांनी केली आहे.



















