बार्टीला पूर्णवेळ महासंचालक नियुक्त करण्याची मागणी; सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना स्मरणपत्र
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, स्वप्नील इंगळे
दि.१२.१०.२०२६
पुणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या शासकीय स्वायत्त संस्थेला मागील पाच महिन्यांपासून पूर्णवेळ महासंचालक नसल्याने संस्थेच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात अडचणी निर्माण होत असल्याची बाब समोर आली आहे. अतिरिक्त कार्यभार असलेल्या महासंचालकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडणेही कठीण होत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात स्वयंदीप सोशल फाउंडेशन, पुणे यांनी मे २०२६ मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री मा. संजय शिरसाट तसेच प्रधान सचिव मा. हर्षदीप कांबळे यांना निवेदन देऊन बार्टीसाठी तातडीने पूर्णवेळ महासंचालकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
मात्र अद्यापही पूर्णवेळ महासंचालकांची नियुक्ती न झाल्याने संस्थेच्या वतीने पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्री मा. संजय शिरसाट यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र देण्यात आले. यावेळी संस्थेच्या सभासद कल्पना कांबळे आणि भीमराव मोटे उपस्थित होते.
बार्टीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी व युवकांच्या विविध कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे आणि वेळेत राबविण्यासाठी पूर्णवेळ महासंचालकांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी स्वयंदीप सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.



















