नवी मुंबई (घणसोली):-सिडकोच्या भूखंडांवर बिल्डरांकडून बेकायदेशीर ताबा? घणसोलीत अनधिकृत फ्लॅट विक्रीचा मनसेचा गंभीर आरोप; तीव्र आंदोलनाचा इशारा..
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.१७.१०.२६
नवी मुंबई – सिडकोने अद्याप विक्री न केलेल्या घणसोली सेक्टर ४ मधील भूखंडांवर बांधकाम व्यावसायिकांनी बेकायदेशीर ताबा मिळवून सदनिकांची (फ्लॅट्स) विक्री सुरू केल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. याप्रकरणी सिडकोकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने मनसेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
माहिती अधिकारातून प्रकार उघडकीस
गजानन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घणसोली सेक्टर ४ मधील भूखंड क्रमांक ३०१ ते ३०७ आणि ३०८ ते ३११ यांची सिडकोने अद्याप कोणालाही विक्री केलेली नाही. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या उत्तरात हे भूखंड अद्याप वितरित केले नसल्याचे सिडको प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बुकिंग कार्यालये थाटून ग्राहकांची फसवणूक
भूखंडांचे वाटप झालेले नसतानाही संबंधित बांधकाम कंपन्यांनी या जागांवर पत्राचे शेड उभारून ताबा मिळवला आहे. तसेच ‘सृष्टी व्हेंचर’ आणि ‘कृष्णा इंपिरियल’ या नावांनी तात्पुरती बुकिंग कार्यालये सुरू करून सदनिका व दुकानांची बेकायदेशीर विक्री केली जात आहे.
प्रस्तावित प्रकल्प: भूखंड क्रमांक ३०१ ते ३०७ येथे ७ मजली इमारतीचे नियोजन सांगून १-BHK सदनिका उपलब्ध असल्याचे ग्राहकांना सांगितले जात आहे.
- किंमत व विक्री: एका सदनिकेची किंमत १ ते १.५ कोटी रुपये दाखवण्यात आली आहे. भूखंड क्रमांक ३०८ ते ३११ येथील ७ मजली प्रस्तावित इमारतीमधील ३५ पैकी १५ सदनिकांची आधीच विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
सिडकोच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
याप्रकरणी सिडकोचे पणन व्यवस्थापक (वाणिज्य) विनू नायर यांना निवेदन देऊन संबंधित बिल्डरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सिडको प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बांधकाम व्यावसायिकांनी कोणत्या अधिकाराने या भूखंडांचा ताबा घेतला आणि या फ्लॅट विक्रीसाठी आवश्यक मान्यता व परवानग्या आहेत का, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.



















